पाण्याच्या ‘व्यावसायिकरणा’चा वसई-विरार पालिकेला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 08:39 AM2021-01-22T08:39:25+5:302021-01-22T08:40:43+5:30

टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत.

Vasai-Virar Municipal Corporation hit by 'commercialization' of water | पाण्याच्या ‘व्यावसायिकरणा’चा वसई-विरार पालिकेला फटका

पाण्याच्या ‘व्यावसायिकरणा’चा वसई-विरार पालिकेला फटका

googlenewsNext

विरार/नालासोपारा : वसई-विरार शहराच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत असून येथील लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागला असून याचा अचूक फायदा घेत टँकर व्यावसायिकांनी वसई-विरारमध्ये आपले बस्तान घट्ट बसविले आहे. पाणी विक्रीतून या लाॅबीला लाखो रुपयांचा नफा होत असताना महापालिकेला मात्र कराचे पैसेही मिळत नसल्याने मोठा फटका बसत असल्याचे उघड झाले आहे.

टँकर व्यावसायिक महापालिका हद्दीतील जलाशये, विहिरी, कूपनलिका व अन्य नैसर्गिक स्रोतांद्वारे मिळणारे पाणी शहरातील सोसायट्या व व्यावसायिकांना अवाच्या सवा दराने विकून त्यातून कोट्यवधी रुपयांचा नफा दरवर्षी मिळवत आहेत. या व्यवहारातून वार्षिक अंदाजे १५० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मागील दहा ते पंधरा वर्षांपासून येथील टँकरमालक बिनदिक्कतपणे पाण्याची लूट करून त्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ घेत आहेत. तरीही आजपर्यंत पालिकेकडून यांच्यावर कोणतीही कर आकारणी केली गेलेली नाही.

वसई-विरार महापालिका हद्दीतील नैसर्गिक पाण्याचे हे बाजारीकरण जोरात सुरू असून या व्यावसायिकांवर पाालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे महापालिका अधिनियम १३० अंतर्गत टँकर व्यावसायिकांना तसेच बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्यांना पाणी लाभ कर आकारला जावा, अशी मागणी केली जात आहे. 

वसई-विरार महानगरपालिकेने  अनधिकृतरीत्या पाणीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारून टँकर व्यावसायिकांसह बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या पाणी लाभ श्रेणीत आणून महापालिकेच्या महसुलात वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.

१२०० रुपयांची गुंतवणूक, २४ हजारांचा नफा!
बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तर सगळ्याच सीमा पार करून २० लीटरचा पाण्याचा बाटला सरासरी ४० रुपयांना विकण्यास सुरुवात केली आहे. १२०० रुपयांना मिळणाऱ्या १२ हजार लीटर पाण्याच्या एका टँकरचे पाणी शुद्धीकरण करून पिण्यास योग्य असल्याचा बनाव करून त्यातून तयार होणारे सहाशे बाटलीबंद डबे विकून हे पाणी विक्रेते सरासरी २४ हजार रुपयांचा भरघोस नफा एका टँकरमागे प्रतिदिन कमवत आहेत. या व्यवहारातून दरवर्षी ८०० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार होत असल्याचा अंदाज आहे.
 

Web Title: Vasai-Virar Municipal Corporation hit by 'commercialization' of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.