वसईत तीन हजार किलो दूषित बर्फ नष्ट
By admin | Published: May 29, 2017 05:44 AM2017-05-29T05:44:29+5:302017-05-29T05:44:29+5:30
ऐन उन्हाळ््यात वसईत सुमारे तीन हजार किलो दूषित बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : ऐन उन्हाळ््यात वसईत सुमारे तीन हजार किलो दूषित बर्फ जप्त करून नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. त्यामुळे वसई विरार परिसरात आरोग्याला हानीकारक असलेल्या दूषित बर्फाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची बाबही उजेडात आली आहे.
वसई विरार परिसरात बर्फाचे कारखाने नाहीत. मात्र, सध्या उन्हाने लोकांना भंडावून सोडले आहे. त्यामुळे शहरात लिंबू सरबत, उसाचा रस, सरबते, आईस्क्रीम, बर्फाचे गोळे, शितपेये विक्री करणाऱ्यांचा धंदा तेजीत आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जात आहे. मात्र, हा बर्फ दूषित असून आरोग्याला घातक असल्याचे अन्न व प्रशासनाच्या कारवाईनंतर उजेडात आले आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी धाडी टाकून तब्बल तीन हजारो किलो बर्फ जप्त करून तो नष्ट केला.
वसई विरार परिसरात ठाणे, कल्याण आणि कोपर खैरणे येथून बर्फ आणला जातो. हा बर्फ गोदामात साठवून ठेवला जातो. त्यानंतर मागणीनुसार त्याचा विक्रेत्यांकडे पुरवठा केला जातो. बर्फाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या दूपित पाण्याचा वापर करून बर्फ बनवत असतात. या बर्फात असलेले ई कोलाय आरोग्यास घातक जीवाणू आढळून आले आहेत. या यामुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, विषमज्वर, कावीळ आणि साथीच्या रोगांची लागण होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. दरम्यान, अन्न व प्रशासन विभागाने छापे मारून जप्त केलेला बर्फ नष्ट करून टाकला आहे. तसेच याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविले आहेत. संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रमुख शंकर बने यांनी केली आहे.