Virar Covid hospital Fire: अश्रूंचे पाट! जीव वाचवणारी रुग्णालयेच ठरताहेत जीवघेणी... जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 06:07 AM2021-04-24T06:07:09+5:302021-04-24T06:07:43+5:30

Virar Covid hospital Fire: विरारमध्ये कोरोना रुग्णालयाला आग नालासोपारात ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे मृत्यू, भांडुप येथे रुग्णालयाला आग लागून दगावलेले कोरोना रुग्ण, नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ कोरोना रुग्णांनी प्राण गमावला आणि आता विरार....

Virar Covid hospital Fire: Hospitals are death taker the ones that save lives ... Who is responsible? | Virar Covid hospital Fire: अश्रूंचे पाट! जीव वाचवणारी रुग्णालयेच ठरताहेत जीवघेणी... जबाबदार कोण?

Virar Covid hospital Fire: अश्रूंचे पाट! जीव वाचवणारी रुग्णालयेच ठरताहेत जीवघेणी... जबाबदार कोण?

Next

प्रतीक ठाकूर 
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : नालासोपारातील ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचे झालेले मृत्यू, भांडुप येथील रुग्णालयाला आग लागून दगावलेले कोरोना रुग्ण आणि नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ कोरोना रुग्णांनी प्राण गमावल्याच्या दुर्दैवी घटना अजून ताज्या असतानाच ठाणे जिल्ह्यातील विरारमधील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत १५ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांत ५ महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. चार रुग्णांना वाचवले होते, मात्र उपचारादरम्यान रात्री दोघांचा मृत्यू झाला.  


विरार (पश्चिम) येथील चार मजली विजय वल्लभ या हॉस्पिटलमध्ये ९० रुग्ण उपचार घेत होते. त्यातील १७ कोरोनाबाधित रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पहाटे सव्वातीनच्या सुमारास रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटांतच अतिदक्षता विभागात आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागली तेव्हा त्या ठिकाणी १७ रुग्ण होते. आग लागल्यावर डॉक्टर आणि कर्मचारी सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर चार रुग्णांनाही वाचविण्यात यश आले. मात्र १३ रुग्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. 


वसई-विरार महापालिका अग्निशमन दलाच्या १० गाड्यांनी दीड तासात आगीवर नियंत्रण मिळवले. बचावलेल्या सर्व रुग्णांना वसई व दहिसर येथील इतर रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी या ठिकाणी धाव घेत एकच आक्रोश केला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, महापालिका आयुक्त गंगाधरन डी., आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, पोलीस आयुक्त सदानंद दाते, पालकमंत्री दादाजी भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, भाजप नेते किरीट सोमैया, मनसे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अशी आहे चौकशी समिती
विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ अध्यक्ष असलेल्या या समितीत महापालिका आयुक्त गंगाथरन डी., जिल्हा वैद्यकीय अधिकारी दयानंद सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त संजय पाटील आणि वसई-विरार महापालिका अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश आहे. समितीने १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करायचा आहे.


व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन यंत्रणेमुळे रुग्ण हालचाल करू शकले नाहीत
मृतांची नावे : उमा सुरेश कनगुटकर (६३), नीलेश भोईर (३५), पुखराज वल्लभदास वैष्णव (६८), रजनी आर. कुडू (६०), नरेंद्र शंकर शिंदे (५८), जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (६३), कुमार किशोर दोशी (४५), रमेश टी. उपायान (५५), प्रवीण शिवलाल गौडा (६५), अमेय राजेश राऊत (२३), शमा अरुण म्हात्रे (४८), सुवर्णा सुधाकर पितळे (६५), सुप्रिया देशमुख (४३), शिवाजी विलकर (५६), निरव संपत (२१)

    वारसांना १० लाखांची मदत 
n दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने पाच लाख रुपये व जखमींना एक लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. 
n वसई-विरार महापालिकेनेही मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. या शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत मंजूर केली आहे.

पतीचा मृत्यू, पत्नीही ॲटॅकने गेली
विरार :  रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत कुमार दोशी यांचा मृत्यू झाला आणि पतीच्या मृत्यूची बातमी समजताच पत्नी चांदनी यांनाही हृदयविकाराचा झटका आला. दोशी दाम्पत्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपासून पत्रकार मनीष म्हात्रे हे आपल्या काकांसाठी ऑक्सिजन बेड शोधत होते; पण त्यांना तो मिळत नव्हता. अखेर परवा त्यांना विजय वल्लभ रुग्णालयात तो मिळाला; पण दुर्दैव असे की आगीत जनार्दन म्हात्रे यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Virar Covid hospital Fire: Hospitals are death taker the ones that save lives ... Who is responsible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.