नालसोपारा : कोरोनाच्या विघ्नामुळे पालघर जिल्ह्यातील गणरायांच्या संख्येत यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली होती. जिल्ह्यात मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त अकरा दिवसांच्या गणरायांना भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यात सुमारे ४४३८ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. या वेळी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोठेही या विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून वाहतूक पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालघर जिल्ह्यात अगदी साधेपणाने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यंदा पालघर जिल्ह्यातील ११ दिवसांच्या १०९ सार्वजनिक तर ४३२९ खाजगी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने बाप्पांचा उत्सव साधेपणाने व सरकारी नियमांतच राहून साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिसाद देत साधेपणाने, गाजावाजा न करता बाप्पांचा उत्सव साजरा केला. याआधी दीड, अडीच, पाच, सहा आणि सात दिवसांच्या जिल्ह्यात १८३२२ घरगुती आणि ४७९ सार्वजनिक बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला होता.जिल्ह्यात मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. वसई तालुक्यात विसर्जन प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले. पालघर जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश असतानाही ११ दिवसांच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक काढून, चारपेक्षा जास्त जण एकत्र आल्याने आणि तोंडाला मास्क न लावल्या प्रकरणी पोलिसांनी हे पाच गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी विरारमध्ये एक, नालासोपारा येथे एक, तुळिंजला दोन आणि वसईला एक असे एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.जव्हारमध्ये भक्तिभावात विसर्जनजव्हार : जव्हारमध्ये कुठलाही गाजावाजा न करता भजन-कीर्तन गात भक्तिभावाने गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव व शासकीय नियम, अटींच्या बंधनामुळे यंदा सर्व मंडळे तथा घरगुती गणपतीचे विसर्जन साधेपणाने करण्यात आले. जव्हार तालुक्यात १४ सार्वजनिक मंडळांचे तर ५० घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.जव्हार शहरातील शेकडो वर्षांची परंपरा असलेला ऐतिहासिक सार्वजनिक श्रीराम मंदिर गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा शहरातील मानाचा गणपती मानला जातो. दरवर्षी ढोल, ताशा, बॅन्जोच्या तालात नाचत, वाजत-गाजत मिरवणूक निघते. यंदा मंडळाच्या महिला वर्गाने नियमात राहून भजन कीर्तनाचे गायन करीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जव्हारच्या सूर्या तलावात विसर्जन करण्यात आले. तसेच यंदा अंबिका मंदिर मित्रमंडळाने घोड्याच्या बग्गीवर गणपती विराजमान करून शहरात मिरवणूक काढून शांततेत विसर्जन केले. विसर्जनाची संपूर्ण तयारी नगर परिषदेकडून करण्यात आली होती, तर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.बाप्पांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप : वसईमध्ये ३२१५ गणेशमूर्तींचे विसर्जनपारोळ : यंदा कोरोना विघ्नामुळे गणरायांच्या उत्सवात हवा तसा जल्लोष भाविकांना करता आला नाही. बाप्पांचा उत्सव सरकारी नियमांतच राहून करण्याची नियमावली असल्यामुळे कोठेही भाविकांना जंगी मिरवणूक काढण्यास मनाई होती. कोरोनामुळे वसई-विरारमधील गणरायांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. याच पार्श्वभूमीवर वसई-विरारकरांनी मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त ११ दिवसांच्या लाडक्या गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. वसई तालुक्यात सुमारे ३२१५ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला असा जयघोष भाविकांकडून पाहायला मिळाला. बाप्पांना निरोप देताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले होते. मात्र, भाविकांनी शासनाच्या नियमांचे पालन करत पालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेल्या ३० ठिकाणी बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. कोठेही या विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.वाड्यात गणपतींना साध्या पद्धतीने निरोपलोकमत न्यूज नेटवर्कवाडा : दहा दिवसांच्या मुक्कामानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला वाड्यात ७ सार्वजनिक आणि ३२ घरगुती बाप्पांना अगदी साध्या पद्धतीने गणेशभक्तांनी निरोप दिला. गणपती विसर्जनाच्या वेळी सुरक्षित अंतर ठेवून कुठेही गर्दी न करता गुलाल, फटक्यांची उधळण न करता शासनाच्या नियमांचे पालन करून भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोनाच्या सावटामुळे या वर्षी प्रथमच मिरवणुका व डिजेच्या आवाजाविना शांततेत, परंतु भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.
लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप, पालघर जिल्ह्यात ४,४३८ गणेशमूर्तींचे विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 1:35 AM