- आशिष राणे वसई : कोरोनाचे संकट आले आणि सर्वच मैफिली सुन्या सुन्या झाल्या. अगदी ऐन पावसात रंगाचा बेरंग झाला. पावसाळा सुरू झाला की, आपोआप तरुणाईची पावले पडतात ती निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे. त्यात पावसाची रिमझिम व त्याला मित्र-मैत्रिणींची सोबत असेल तर मग काय आनंदाला पारावारच राहत नाही. मात्र मागील चार महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे सर्व पर्यटनस्थळे बंद असल्याने तरुणाईच्या आनंदावर अक्षरश: विरजण पडले आहे.
सध्या कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. पर्यटन व्यावसायिक, रिसॉर्ट मालक बंद पडलेली पर्यटकांची ही मैफील पुन्हा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील मार्च महिन्यापासून पूर्णपणे हा व्यवसाय ठप्पच झाला असून आता हळूहळू शासन लॉकडाऊनमधून बाहेर पडत काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत असले तरी गर्दीची ठिकाणे वगळण्यात येत आहेत. त्यात पर्यटन व्यवसायाचा समावेश आहे.
यंदा गटारीदेखील अशीच कोरडी गेली. कारण हॉटेल, रेस्टॉरंट, बार, रिसॉर्ट बंद आहेत. त्यामुळेही एक वेगळी मौजमजा वाया गेली, असे हौशी पर्यटक म्हणतात. ऐन गटारीच्या वेळी एका बाजूला पडणारा पाऊस आणि दुसऱ्या बाजूला पर्यटनस्थळांकडे येणारे पर्यटक असे चित्र वर्षानुवर्षे दिसत असले तरी या वर्षी मात्र सुट्टीचा काळ, मग शनिवार-रविवार असो वा सणासुदीची सुट्टी असो, कोरोनाच्या संकटात वाहून गेली. गटारीआधी व त्या दिवशी होणाºया सर्व मैफिली मात्र सुन्या झाल्या आणि त्याचा सर्वात जास्त फटका जसा पर्यटकांना बसला, तसाच तो पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांनाही बसला आहे.
गटारीच्या काळात वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणांवर लाखोंची उलाढाल होत होती, ती ठप्प झाली. या पर्यटन व्यवसायावर इतर अनेक उद्योग अवलंबून असून त्या उद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे. अर्ना$ळा समुद्रकिनारा, कळंब, राजोडी बीच, तुंगारेश्वर, चिंचोटी धबधबा, वरई येथील गरम पाण्याची कुंडे, केळवा आणि माहीम बीच, बोर्डीचा समुद्रकिनारा, जव्हारमधील दाभोसा धबधबा अशी अनेक ठिकाणे आज पर्यटकांची चातक पक्ष्यासारखी वाट पाहत आहेत.
कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्याचप्रमाणे पर्यटन व्यवसायही बंद पडला आहे. शासनाने आता हा व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी आम्हाला मदतीचा हात द्यावा. या व्यवसायावर अनेक व्यवसायही अवलंबून आहेत. त्यांनाही फटका बसला आहे. शासनाचे नियम व अटी पाळून हा व्यवसाय आता सुरू झाला पाहिजे.- धीरज निजाई, क्षितिज रिसॉर्ट, मिनी गोवा, कळंब
देशातील आणि राज्यातील पर्यटक आपल्याकडील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. त्या दृष्टीने त्यांच्याकडून विचारणा होत आहे. लॉकडाऊनपूर्वी परदेशी पर्यटक वसई व आसपासचा भाग पाहण्यासाठी येत होते. त्या ठिकाणी आता राज्यातील पर्यटक विचारणा करत आहेत. पालघर जिल्ह्यात तसेच वसईत तसा प्रयत्न झाल्यास नक्कीच शासनास महसूल मिळण्यास मदत होईल.- किरण भोईर, संचालक, केएमसी हॉलिडेज