रविंद्र साळवे / मोखाडाभीषण पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी तालुक्यातील शिरसोन पाडा येथे भगिनी निवेदिता मंडळ, इंडियन वॉटर वर्क असोसिएशन, सरस्वती अभियांत्रिकी विद्यालय खारघर, पालघर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यामाने व ग्रामस्थांच्या श्रमदानातून पाणीपुरवठा योजना साकार झाली असून तिचा लोकार्पण सोहळा जि.प.च्या सीईओ निधी चौधरींच्या हस्ते शुक्रवारी झाला. तीव्र पाणी टंचाईत पाणी उपलब्ध झाल्याने येथील आदिवासींच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. संबधित सेवा भावी संस्थेने गावात दहा हजार क्षमतेच्या दोन टाक्या बांधल्या आहेत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या निधीतून सोलर पम्प बसवण्यात आले व जव्हार पाणी पुरवठा विभागाने पाणी टाकीपर्यंत पोहचविले. ग्रामस्थांनी दहा दिवस श्रमदान केले. खारघर येथील सरस्वती कॉलेजच्या इंजिनीअरींच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या फेरो सिमेंट वॉटरचे यावेळी उदघाटन करण्यात आले त्यांनी या पाड्यावर सात दिवस खपून हे सिमेंट वॉटर टँक बांधले तसेच नदीपात्रातील गाळ काढला. डी. एच. ओ. संतोष राठोड, उपसभापती मधु डामसे, जव्हार पाणी पुरवठा विभागाचे सचिन खंबाईत, पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरसोन पाडयाला मिळाले पाणी
By admin | Published: March 26, 2017 4:16 AM