विरारमधील जलस्रोत संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:08 AM2018-11-14T05:08:45+5:302018-11-14T05:09:32+5:30
पन्नास वर्ष जुना बावखल बाधीत : सांडपाण्यामुळे परिसरात रोगराई
विरार : येथील एका अनधिकृत इमारतीच्या विकासकाने सांडपाणी दोन फुटावर असलेल्या मुख्य नाल्यात न सोडता शेजारी असलेल्या जवळपास ५० वर्ष जुन्या बावखलात सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिणामी येथील रहिवाशाना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
एकीकडे वसई विरार शहरात पाण्याचा तुटवडा असतानाच नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत नष्ट करण्याचे प्रयत्न अनधिकृत विकासकांकडून सुरु आहे. झपाट्याने वाढत चाललेली बांधकामे व त्याकडे महापालिकेने केलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढत चालले आहे. विरार पूर्व येथील फुलपाडा स्थित गांधी चौक येथे झा निवास ही इमारत आहे. तिचे बांधकाम मुख्य नाल्याच्या कठड्यावर केले आहे. ती इमारत दहा वर्ष जुनी असून तेथे जवळपास शंभरहुन अधिक कुटुंब येथे राहत आहेत. या प्रकरणाबाबत महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ लक्ष देत सबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत विकासक पवन तिवारी म्हणाले की, या इमारतीचे बांधकाम हे दहा वर्ष जुने आहे. इमारत बांधली होती तेव्हा आम्ही त्याची ड्रेनेज लाईन चेंबर बनवून मुख्य नाल्यात सोडली होती. त्यानंतर या इमारतीचा ताबा सोसायटी स्थापन झाल्यानंतर रहिवाशांना देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून चेंबर तुटलेल्या अवस्थेत असल्याने बिल्डिंगचे सांडपाणी बावखलात जात आहे.
दहा वर्षांपूर्वी इमारत बांधली होती तेव्हा आम्ही त्याची ड्रेनेज लाईन चेंबर बनवून मुख्य नाल्यात सोडली होती. गेल्या दोन वर्षांपासून चेंबर तुटलेल्या सांडपाणी बावखलात जात आहे. चेंबर दुरु स्त करण्याचे काम सोसायटीचे आहे.
- पवन तिवारी (विकासक)
या परिसरात आम्ही पिढ्या-न-पिढ्या राहत असून पूर्वी या बावखलाच्या पाण्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी वापर केला जात होता. मात्र हे बावखल आता सांडपाण्याच्या विळख्यात अडकले आहे.
- अक्षय पाटील, स्थानिक