बोर्डी: पालघर जिल्हा भारत स्काऊट्स गाईड्स, पंचायत समिती डहाणू व जिल्हा परिषद शाळा चंद्रनगर यांनी २३ मार्च रोजी तालुकास्तरीय कब, बुलबुल महोत्सव चंद्रनगर शाळेत आयोजित केला होता. त्यात २५ पथकांनी सहभाग घेतला. ६ ते १३ वयोगटातील विद्यार्थ्यांवर संस्कार, मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी सांगितले. शारीरिक प्रात्यिक्षक, संस्कृती दर्शन, आनंदमयी खेळ, स्काऊट गाईडचे नियम व शिस्त या विषयी जिल्हा संघटक रामा गावित, निलेश भोईर, हर्षल चौधरी यांनी मार्गदर्शन केले. वाणगाव, कोमपाडा, वाकीपाडा, गोवणे, दाभले, आंबातपाडा, पळे या शाळेतील पथकं सहभागी झाली होती. उद्योजक महादेव सावे यांनी थंडपाणी व सरबत देण्याची व्यवस्था केली. सहभागी विद्यार्थ्यांना विजय वाघमारे यांनी पुस्तकांचे तर बक्षिसे व वह्यांचे वाटप भारत विकास परिषदेच्या मालाड फिल्मसिटी शाखेने केले. लेझीमने प्रारंभ झाल्यानंतर संयोजन शैलेश राऊत व दिपक देसले यांनी केले. शाळेतील सातव्या वर्गाच्या आयशा सोलंकी या विद्यार्थिनीने खुमासदार सूत्रसंचालनाने वाहवा मिळवली. यशस्वी आयोजनाने शाळा कौतुकास पात्र ठरली आहे. वणईचंद्रनगर चे उपसरपंच प्रताप सांबर व युवक वर्ग यांनी विशेष परीश्रम घेतले.
चंद्रनगर शाळेत स्काउट गाईड्सचा कब, बुलबुल महोत्सव
By admin | Published: March 27, 2017 5:32 AM