दीड एकरात मिरचीचे १०० क्विंटल उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 03:24 PM2020-02-23T15:24:29+5:302020-02-23T15:24:42+5:30
यामाध्यमातून साधारणत: ३ लाख रुपये मिळाल्याची माहिती शेतकरी बोरकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात एक अक्षरी नाव असलेल्या टो या गावातील शेतकरी शिवाजी बोरकर या युवा शेतकऱ्याने आपल्या अवघ्या दीड एकर शेतात १०० क्विंटल मिर्ची पिकविण्याची किमया साध्य करून दाखविली. वाशिमच्या बाजारात मिर्चीला ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. यामाध्यमातून साधारणत: ३ लाख रुपये मिळाल्याची माहिती शेतकरी बोरकर यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना शेतकरी बोरकर यांनी सांगितले, खरीप हंगामातील सोयाबिनची काढणी झाल्यानंतर दीड एकर शेतात डिसेंबर महिन्यात मिर्ची रोपांची लागवड केली. उच्च प्रतीचे बियाणे, खत, पाणी यासह इतर अत्यावश्यक बाबींचे योग्य नियोजन केल्याने फेब्रूवारी महिन्याच्या प्रारंभीपासूनच मिर्चीची तोड सुरू झाली. यामाध्यमातून आतापर्यंत चारवेळा मिर्चीची तोड करून सुमारे १०० क्विंटल मिर्चीची वाशिमच्या बाजारपेठेत विक्री केली. आणखीनही ५० क्विंटलच्या आसपास मिर्ची झाडाला शिल्लक असून दीड लाख रुपये मिळतील, अशी अपेक्षा शेतकरी बोरकर यांनी व्यक्त केली.
दीड एकरातच १५ क्विंटल सोयाबिनचेही उत्पन्न
टो येथील शेतकरी शिवाजी बोरकर याने खरीप हंगामात दीड एकरच क्षेत्रातून तब्बल १५ क्विंटल सोयाबिनचेही उत्पादन घेतले, हे विशेष. शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून उत्पन्न घेत राहायला हवे, असा सल्ला शेतकरी बोरकर यांनी यानिमित्ताने दिला.