वाशिम : स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत जिल्ह्यातील १०३२ कुटुंबांच्या शौचालयांची कामे खोळंबली असून जूनमध्ये कामे पूर्ण झाली नाहीत, तर निधी शासनजमा होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पुढील आठवड्यात शौचालयांची कामे पूर्ण न झाल्यास पंचायत समितीस्तरावरील ग्रामसेवकांची सुनावणी घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी बुधवारी दिले.
स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत जानेवारी- २०२१ मध्ये जिल्ह्यात एकूण तीन हजार नवीन शौचालयांचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. त्यापैकी १९६८ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. कोविड-१९ मुळे सदर कामाला विलंब झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी, कामे पूर्ण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सहा महिन्यांपासून संबंधित गावांचा निधी तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण होऊन संबंधित लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधी वितरित करण्यात आला. मात्र आता सहा महिन्यांचा कालावधी उलटत असून काही ग्रामसेवक या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्य शासनाने याबाबत अहवाल मागविला असून ३० जूनला निधी परत मागविला जाऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्राने सांगितले. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांना निर्देश देऊन संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा दिला. याअनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी जिल्हा व तालुका कक्षाचे समन्वयक व सल्लागार यांची तातडीची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. पुढील आठवडयात शौचालयांची कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी बोलावून सुनावणी घेण्याचे निर्देश वसुमना पंत यांनी दिले आहेत.
.....
तालुकानिहाय अपूर्ण शौचालये...
मानोरा 0
कारंजा १६
मंगरुळपीर ४६
वाशिम १५१
मालेगाव ३२९
रिसोड ४९०
०००००००००००
या ग्रामपंचायतींना रेड अलर्ट...
शौचालय बांधकामात रिसोड, मालेगाव आणि वाशिम तालुके मागे राहिले असून त्यांना रेड अलर्ट देण्यात आला. रिसोड तालुक्यातील लेहणी, येवता, करडा, एकलासपूर, चिचांबापेन, शेलगाव राजगुरे, लोणी बु, कोयाळी बु, कवठा, लिंगा कोतवाल, नंधाना, निजामपूर, वाडी यारताळ, भरजाहांगीर मसलापेन, रिठद मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मुंगळा, राजुरा, पांगरखेड, तळोदी, किन्हीराजा, दुबळवेल, मंगरुळपीर तालुक्यातील कोळंबी, वाशिम तालुक्यातील देपुळ, गोंडेगाव, सापळी, सुराळा या गावांमध्ये शौचालय बांधकामाचे जास्त टार्गेट शिल्लक असल्याने या गावांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
०००००००