शिरपूर जैन : पोकलेन मशीन विक्रीसाठी असून, ती विकत घेण्यासाठी बोलावलेल्या गणेश माणिकराव बोराडे (रा.बोद्री, ता.भोकरदन, जि.जालना) यास शिरपूरपासून जवळच असलेल्या पांगरखेडा येथे चाकूचा धाक दाखवून १६ लाख रुपयांनी लुटल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी १७ सप्टेंबर रोजी दाखल तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बादल शिका चव्हाण (अत्रज, ता.खामगाव, जि.बुलडाणा) हा गणेश बोराडे यांच्याकडे भाड्याने घेतलेल्या पोकलेन मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करीत होता. काही दिवसांनंतर बादलने गणेश बोराडे यांना भाड्याची पोकलेन घेतल्यापेक्षा स्वत:च एखादी जुनी पोकलेन विकत घेण्याचा आग्रह केला. बोराडे यांनी त्यास सहमती दर्शविली. त्याचाच गैरफायदा घेऊन बादलने आमच्याकडे जुनी पोकलेन मशीन विक्रीसाठी असल्याचे बोराडे यांना मोबाइलद्वारे सांगितले. मशीन घेण्याकरिता १६ लाख रुपये घेऊन, त्याने बोराडे यांना पांगरखेडा येथे बोलाविले. बोराडे हे पैसे घेऊन पांगरखेडा येथे आले असता, रमेश ग्यानू चव्हाण यांच्याकडे चहापाणी झाल्यानंतर, वाहनाजवळ पैसे घेण्यासाठी येताच, बादल चव्हाणने बोराडे यांना चाकूचा धाक दाखविला. मोबाइल व गाडीची चावी हिसकावून घेतली आणि १६ लाख रुपये लुटले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अवस्थेत बोराडे हे आपल्या गावी परत गेले. त्यांनी शुक्रवारी शिरपूर येथे येऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी बादल चव्हाण, रमेश ग्यानू चव्हाण, नरेंद्र रमेश चव्हाण, विजेंद्र रमेश चव्हाण, गोपाल पवार आदींसह अनोळखी पाच ते सहा जणांविरुद्ध कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला.
............
तीनच तासांत तीन आरोपी जेरबंद
शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे, सहायक पोलीस निरीक्षक बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची सूत्र गतीने फिरवत, अवघ्या तीनच तासांत तीन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकास रवाना करण्यात आल्याची माहिती ठाणेदार वानखेडे यांनी दिली.