विलगीकरण कक्षात २१ बेड; ६१ रुग्णांना ठेवणार कोठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:30 AM2021-05-29T04:30:00+5:302021-05-29T04:30:00+5:30
गृह विलगीकरणामुळे कोरोना बाधित रुग्णांपासून कुटुंबातील व्यक्तीस होणारा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी किमान १० बेडचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करावे, ...
गृह विलगीकरणामुळे कोरोना बाधित रुग्णांपासून कुटुंबातील व्यक्तीस होणारा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी किमान १० बेडचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करावे, असे आदेश प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार, शिरपूर ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे, सरपंच राजकन्या अढागळे, उपसरपंच असलम परसुवाले यांनी पुढाकार घेत आठवडी बाजारानजीकच्या कन्या उर्दू शाळेत २१ बेडचे विलगीकरण कक्ष २८ मेपासून कार्यान्वित केले; मात्र ही सुविधा तुलनेने अधिक लोकसंख्या असणाऱ्या शिरपूरसारख्या गावात तोकडी पडणार असल्याचे दिसून येत आहे.
....................
निधी खर्चासाठी वरिष्ठांच्या परवानगीची गरज
शिरपूर ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून ९३ लाखांचा निधी मिळालेला आहे. त्यातून सध्या कोरोना बाधितांकरिता सुसज्ज तथा अधिक क्षमतेचे विलगीकरण कक्ष स्थापन करणे शक्य आहे; मात्र त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते, असे ग्राम विकास अधिकारी भागवत भुरकाडे यांनी सांगितले.
...................
सुसज्ज तथा पुरेशा क्षमतेचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी. रुग्णसंख्या अधिक झाल्यास जुन्या आठवडी बाजारातील जिल्हा परिषद शाळेत महिला रुग्णांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येईल. गावकरी, आरोग्य, पोलीस, महसूल विभागाच्या सहकार्याने गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील.
- अशोकराव अंभोरे
सत्ताधारी गट प्रमुख, शिरपूर जैन