- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून, यामधून विविध प्रकारची औषधीदेखील सुटू शकली नाही. वेदनाशामक गोळ्या, अस्थिरोग, शस्त्रक्रियेशी संबंधित औषधी व उपकरणे यासह अन्य औषधींच्या किमतीत सरासरी २० ते २५ टक्क्याने वाढ झाल्याने याचा भुर्दंड रुग्णांना बसत आहे. दुसरीकडे मधुमेह व रक्तदाब या आजाराशी निगडित औषधींच्या किमती जवळपास १० टक्क्याने कमी झाल्या आहेत. यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत कच्चा माल, वाहतुकीचा व कामगारांचा प्रश्न यामुळे बहुतांश कंपन्यांची उत्पादने प्रभावित झाली होती. यामध्ये आरोग्य विभागाशी निगडित काही औषधींचादेखील समावेश आहे. गत चार महिन्यांच्या कालावधीत वेदनाशामक गोळ्या, मलम, सर्दी, तापेच्या गोळ्या, अस्थिरोग व शस्त्रक्रियेशी संबंधित औषधी व उपकरणे आदींच्या किमतीत २० ते ३० टक्क्याने वाढ झाल्याने याचा भुर्दंड रुग्णांना बसत आहे.
या कारणास्तव वाढल्या किमतीलाॅकडाऊनच्य कालावधीत विविध कंपनींची उत्पादने प्रभावित झाली होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते. ज्या औषधीला फारशी मागणी नव्हती त्याच्या किमतीत घट झाल्याचेही दिसून येते.
मधुमेह, रक्तदाबाशी संबंधित औषधींच्या किमतीत घट औषधींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी आढावा घेऊन उपाययोजना केल्या जातात. मध्यंतरी रेमडेसिवर इंजेक्शनच्या किमती वाढल्या होत्या. त्यानंतर सरासरी २,३०० रुपये किंमत करण्यात आली. मधुमेह व रक्तदाब या आजाराशी संबंधित औषधींच्या किमतीत साधारणत: १० टक्क्याने घट झाल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. कान, नाक, घसा, नेत्र या आजाराशी संबंधित बहुतांश औषधींच्या किमती जैसे थे आहेत.
लाॅकडाऊनच्या कालावधीत अनेक आजाराशी संबंधित औषधींच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. वेदनाशामक असलेली एका कंपनीची गोळी (टॅब्लेट) लाॅकडाऊनपूर्वी १४ रुपयांची होती. आता ही गोळी २२ रुपयाला विकली जात आहे. सर्दी, ताप, अस्थिरोग, शस्त्रक्रियेशी संबंधित औषधीच्या किमतीतदेखील वाढ झाल्याने याचा भुर्दंड रुग्णांना बसत आहे.- गजानन तुर्के, नागरीक वाशिम
विविध आजारांशी संबंधित औषधीच्या किमतीत नेहमीच चढ-उतार होत असतात. लाॅकडाऊनपूर्वी आणि लाॅकडाऊननंतर काही प्रकारच्या औषधीच्या किमतीत वाढ झाली तर काही प्रकारच्या औषधीच्या किमतीत घट झाल्याचे दिसून येते. विशेषत: मधुमेह व रक्तदाबाशी संबंधित औषधीच्या किमतीत घट झाली आहे.- राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन, वाशिम