वाशिम जिल्हयातील ३३७ पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:06 PM2019-07-17T15:06:54+5:302019-07-17T15:07:00+5:30

१४२७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता तब्बल ३३७ पाणी नमुने दूषित असल्याचे सिध्द झाले.

337 water samples of Washim district polluted | वाशिम जिल्हयातील ३३७ पाणी नमुने दूषित

वाशिम जिल्हयातील ३३७ पाणी नमुने दूषित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या वतीने पावसाळ्याच्या पृष्ठभुमीवर जिल्हाभरातील १५२४ पाणी नमुने संकलित करुन पाणी तपासणी प्रयोगशाळेकडे पाठविले. यातील १४२७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता तब्बल ३३७ पाणी नमुने दूषित असल्याचे सिध्द झाले. त्यापैकी ३२५ पाणी नमुन्यांत नायट्रेटचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक आढळले आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याने जलस्त्रोतांचे शुध्दीकरण करण्याच्या सुचना भुजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेने दिल्या आहेत .
जिल्हा परिषदेच्यावतीने पावसाळ्याच्या पृष्ठभुमीवर जिल्हाभरातील १५२४ पाणी नमुने संकलित केले. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील १५६, रिसोड तालुक्यातील १३२, मालेगाव तालुक्यातील ५३, मंगरुळपीर तालुक्यातील ४०७, कारंजा तालुक्यातील ४२० आणि मानोरा तालुक्यातील ३५६ नमुन्यांचा समावेश होता. यातील १४२४ नमुन्यांची जिल्हा प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यामध्ये वाशिम तालुक्यातील १५६ पैकी २४, रिसोड तालुक्यातील १३२ पैकी १८, मालेगाव तालुक्यातील ५३ पैकी ३, मंगरुळपीर तालुक्यातील ४०७ पैकी ७४, कारंजा तालुक्यातील ४२० पैकी १३२ आणि मानोरा तालुक्यातील ३५६ पैकी ८६ नमुने दूषित असल्याचे आढळले आहे. दूषित आढळलेल्या एकूण १४२७ नमुन्यापैकी ३२५ नमुन्यांत नायट्रेटचे प्रमाण आवश्यक ते पेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. त्याशिवाय दूषित ४ नमुन्यांत फ्लोराईड, १३ नमुन्यांत टीडीएस आणि एका नमुन्यात अल्काचे प्रमाणही आढळले आहे. भुजल सर्वेक्षण आणि विकास संस्थेच्या प्रयोग शाळेकडून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले असून, संबंधित जलस्त्रोतांचे शुध्दीकरण करण्याबाबत आवश्यक उपाय योजना करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत.
(प्रतिनिधी)

नायट्रेटचे वाढते प्रमाण चिंताजनक
जिल्ह्यातील शेती व्यवसायासाठी रासायनिक खतांचा वापर काही वर्षांत भरमसाठ वाढला असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील पाण्याच्या स्रोतात नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, अशा स्रोतांतील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने त्याचा दुष्परिणाम नागरिकांसह शेतकऱ्यांकडील पशुधनाच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. उघड्यावरील गटारी व शेतात पिकांवर फवारणाºया रासायनिक औषधांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्याचे तपासणीत समोर आले.

पिण्याच्या पाण्यात भारतीय मानकानुसर नायट्रेटच्या सहनशील प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात ३२५ नमुन्यांत नायट्रेट आढळले आहे. त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

- एस. एस. कडू
वरिष्ठ भुवैज्ञानिक
भुजल सर्वेक्षण आणि विकास संस्था.

पिण्याच्या पाण्यात नायट्रेट असायलाच नको; परंतु या घटकद्रव्याचे प्रमाण पाण्यात आढळते. त्याचे प्रमाण निर्धारित आहे. त्यापेक्षा अधिक प्रमाणात नायट्रेट असल्यास मेंदूचे गंभीर आजार बळावतात.
- डॉ. निलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ, कारंजा लाड

Web Title: 337 water samples of Washim district polluted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.