वाशिम जिल्ह्यातील ३७४ शिक्षकांची बदली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 03:12 PM2019-06-21T15:12:44+5:302019-06-21T15:12:49+5:30
वाशिम जिल्ह्यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या चारही संवर्गातील मिळून ३७४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, ३७ शिक्षक विस्थापित झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया गुरुवारी पार पडली. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात आॅनलाईन अर्ज करणाऱ्या चारही संवर्गातील मिळून ३७४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, ३७ शिक्षक विस्थापित झाले आहेत. शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवार २१ जून रोजी पंचायत समितीस्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले जाणार आहेत.
जि. प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी चारही संवर्गातील पदनिहाय व क्षेत्रनिहाय अंतिम बदलीपात्र शिक्षक यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर बदली पोर्टलवर सर्व शिक्षकांची टीयूसी व नॉन टीयूसी अपडेट करून, रिक्त असणारी पदनिहाय जागा प्रसिध्द करण्यात आल्या. त्या रिक्त जागा बदली पोर्टल वर अपडेटही करण्यात आल्या. त्याशिवाय पती-पत्नी समानीकरणाच्या जागा प्रसिध्द करून बदली पोर्टल वर अपडेट करण्यात आल्या. त्यानंतर शिक्षकांनी आॅनलाईन बदली पोर्टलवर अर्ज सादर केले. त्यात संवर्ग १ मधील विविध प्रकारचे आजार, दिव्यांग, परितक्त्या, विधवा, माजी सैनिक पत्नी, दिव्यांग मुलांचे पालक, तर संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, तसेच संवर्ग ३ मधील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदली पोर्टलवर आॅनलाईन अर्ज केले होते. या तीन संवर्गातील बदल्या निश्चित झाल्यानंतर संवर्ग चारमधील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील चारही संवर्गातील मिळून ३७४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता बदली प्रक्रिया पार पडली असली तरी, अद्याप आदेश काढण्यात आले नसून, ही प्रक्रिया २१ जून रोजी पार पडल्यानंतर शिक्षकांना बदली आदेश प्राप्त होणार आहेत. यानंतर शिक्षकांचे आक्षेप आणि हरकती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, या प्रक्रियेत समुपदेशनातून मार्ग काढण्यात येईल.
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतंर्गत ३७४ शिक्षकांची बदली झाली; तर ३७ शिक्षक विस्थापित झाले. त्याचे अंतिम आदेश मात्र अद्याप निघालेले नाहीत. २१ जून रोजी सदर आदेश काढले जातील.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जि.प. वाशिम