संतोष वानखडे
वाशिम : संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २.६९ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी क्षयरोगाचे ४४८, तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले असून, २७ क्षयरुग्ण, तर ११ कुष्ठरुग्ण असल्याचे निदान झाले. ३१ ऑक्टोबरपर्यंत १०.६२ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधून व संशयित क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करून रोगाचे निदान व औषधोपचार केला जाणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन विनाविकृती कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीचा मोफत औषधोपचार देणे तसेच विकृती प्रतिबंध करणे आणि समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाच्या संसर्गाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत १० लाख ६२ हजार ८७१ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये शहरी भागातील ७३०१७ तर ग्रामीण भागातील ९८९८५४ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक अशा एकूण १०३९ जणांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २.६९ लाख नागरिकांची तपासणी झाली आहे. यापैकी क्षयरोगाचे ४४८, तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले. यापैकी २७ जणांना क्षयरोग तर ११ जणांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले. या सर्व रुग्णांना उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान गृहभेटीकरिता येणा-या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.व्ही. देशपांडे यांनी केले.
०००००००००
लक्षणे असल्यास थुंकी नमुना तपासणी
जिल्ह्यातील निवडक आरोग्य संस्थांमध्ये मोफत थुंकी नमुना तपासणी व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय संस्थांमध्ये क्ष-किरण तपासणी तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी निवडक खासगी संस्थांमध्ये मोफत क्ष-किरण व्यवस्था उपलब्ध आहे. सिबीनॅट मशीनव्दारे तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. क्षयरुग्णांना मोफत उपचार सर्व शासकीय संस्थांमध्ये उपलब्ध आहे. क्षयरोगाची लक्षणे दिसून येताच थुंकी नमुना तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००००००००
कोट बॉक्स
संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिमेंतर्गत जिल्ह्यात १० लाख ६२ हजार ८७१ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीतून क्षयरोगाचे ४४८ तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले. यापैकी २७ जणांना क्षयरोग तर ११ जणांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले असून या सर्व रुग्णांना उपचाराखाली ठेवण्यात आले आहे.
- डॉ. एस.व्ही. देशपांडे
जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम