वाशिम : अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर खबरदारीचा प्रयत्न म्हणून संबंधित क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केले जात आहेत. जिल्ह्यात ५५६ प्रतिबंधित क्षेत्र असून, या भागातील नागरिकांवर वॉच ठेवताना प्रशासनाची कसरत होत आहे.
जिल्ह्यात गतवर्षी ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक होता. त्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारी २०२१ या दरम्यान कोरोनाचा आलेख खाली आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा दिलासा औटघटकेचा ठरला असून, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च व एप्रिल या महिन्यात कोरोनाचा कहर असल्याने, यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न म्हणून प्रतिबंधित क्षेत्राची पुन्हा अंमलबजावणी सुरू झाली. ज्या वस्तीत, बिल्डिंग किंवा घरामध्ये जास्त संख्येने रुग्ण आढळून येत आहेत, तेवढा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गोवर्धन या गावात सर्वाधिक ६५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गावच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या गावातून बाहेर जाण्यास तसेच बाहेरून गावात येण्यास प्रतिबंध आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेचे कारण समोर करून काहीजण गावात प्रवेश करीत असल्याची माहिती आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण अधिक संख्येने आढळून येत असल्याने ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्राची संख्या अधिक आहे. प्रतिबंधित बिल्डिंग, घर, वस्ती किंवा गावातील नागरिकांपासून इतरांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये तसेच इतरांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संपर्कात येऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील (घर, बिल्डिंग, वस्ती) काही जण बाहेर पडत असताना, त्यांना समजावून सांगण्यात कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक वेळ जात असल्याचे सूत्राने सांगितले. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य समजून घेऊन इतरांच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घेणे काळाची गरज ठरत आहे.
०००
बॉक्स
प्रतिबंधित क्षेत्रासंदर्भात फलक, बांबू हटविले !
प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणी बांबू लावून रस्ता अडविण्यात येतो तसेच संबंधित घरांवर फलकही लावण्यात येते. मात्र, अनेकजण बांबू काढून मुक्त संचार करीत असल्याचे तसेच घरावरील फलकही काढत असल्याची माहिती आहे. हा प्रकार ग्रामीण भागात सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील फलक, बांबू जागेवरच आहेत की काढण्यात आले, याची पडताळणी करणे आवश्यक ठरत आहे.
.......
कोट बॉक्स
जिल्ह्यात ग्रामीण भागात ३१६ आणि शहरी भागात २४० प्रतिबंधित क्षेत्र आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी इतरांच्या संपर्कात न येता आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना दिलेल्या आहेत.
-डॉ.अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.
00000000000
असे आहेत प्रतिबंधित क्षेत्र
तालुका ग्रामीण शहर
वाशिम २१ १७१
मालेगाव ७३ ०९
रिसोड ५७ १४
मं.पीर ५२ १८
कारंजा ५१ २३
मानोरा ६२ ०५
एकूण ३१६ २४०