वाशिम जिल्ह्यातील ७२५ शाळांचा 'रोहयो'च्या माध्यमातून होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 10:45 AM2021-01-20T10:45:36+5:302021-01-20T11:08:17+5:30
Washim School News वाशिम जिल्ह्यातील ७२५ शाळांकडून विविध सुविधांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
- दादाराव गायकवाड
वाशिम: शालेय विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून शाळा व परिसर आकर्षक असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता जि. प. शाळा, अंगणवाडी केंद्रांत रोहयोच्या माध्यमातून विविध सुविधा निर्माण करण्याचे शासनाने ठरविले आहे. या संदर्भात १ डिसेंबर २०२० रोजी परिपत्रक जारी करून शाळांकडून प्रस्ताव मागविण्याच्या सुचना सर्व जिल्हास्तरावर देण्यात आल्या. यात वाशिम जिल्ह्यातील ७२५ शाळांकडून विविध सुविधांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास देशाचे उज्ज्वल भविष्यही ठरू शकतात. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांतून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळांचा परिसरही सुंदर असणे आवश्यक आहे.
स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेल्या परिसरात शिकणे आणि शिकविणे या दोन्ही प्रक्रिया आनंददायी होईल. अशा परिसरात दिवसभर मन प्रसन्न राहील. अशाने, मुले शाळेकडे पर्यायाने शिक्षणाकडे आकर्षित होतील. ही बाब लक्षात घेऊनच शाळांचा परिसर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुंदर बनवून शाळांचा भौतिक विकास साधण्याचे शासनाने ठरविले आणि या संदर्भात १ डिसेंबर २०२० रोजी परिपत्रक जारी करून विविध सुविधांच्या उपलब्धतेसाठी शाळांकडून प्रस्ताव मागविण्याच्या सुचना जिल्हास्तरावर देण्यात आल्या आहेत. यात वाशिम जिल्ह्यातील ७३४ शाळांपैकी ७२५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर केले आहेत.
शासनाच्या परिपत्रकानुसार रोहयोच्या माध्यमांतून शाळांच्या परिसरात भौतिक सुविधांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना गटशिक्षणाधिकाºयांमार्फत सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. आजवर ७३५ शाळांपैकी ५६९ शाळांनी या अंतर्गत प्रस्ताव सादर केले असून, त्यांची पडताळणी रोहयो प्रशिक्षकांमार्फत केली जात आहे.
-गजाननराव डाबेराव,
प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. वाशिम