आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास देशाचे उज्ज्वल भविष्यही ठरू शकतात. महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांतून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळांचा परिसरही सुंदर असणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेल्या परिसरात शिकणे आणि शिकविणे या दोन्ही प्रक्रिया आनंददायी होईल. अशा परिसरात दिवसभर मन प्रसन्न राहील. अशाने, मुले शाळेकडे पर्यायाने शिक्षणाकडे आकर्षित होतील. ही बाब लक्षात घेऊनच शाळांचा परिसर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुंदर बनवून शाळांचा भौतिक विकास साधण्याचे शासनाने ठरविले आणि या संदर्भात १ डिसेंबर २०२० रोजी परिपत्रक जारी करून विविध सुविधांच्या उपलब्धतेसाठी शाळांकडून प्रस्ताव मागविण्याच्या सूचना जिल्हास्तरावर देण्यात आल्या आहेत. यात वाशिम जिल्ह्यातील ५६९ शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर केले आहेत.
------------
रोहयो प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात कामे
शासन परिपत्रकानुसार रोहयो अंतर्गत शाळा, अंगणवाडीच्या इमारतीत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी आलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून, त्या प्रस्तावातील मागणीनुसार संबंधित शाळेत ती कामे कशी केली जातील, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो विभागात प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित प्रशिक्षक शिक्षण विभागाच्या सहकार्याने शाळांत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करून त्या संबंधीचा अंतिम प्रस्तावही तयार करणार आहे.
---------
प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांची संख्या
तालुका शाळा
वाशिम ९८
कारंजा ९१
मं.पीर ९०
मानोरा १०२
मालेगाव ९२
रिसोड ९६
-----------------------
वृक्ष लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंगसह मैदानांवर भर
शाळा परिसरात विद्यार्थी रमावेत, परिसर स्वच्छ असावा, शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा म्हणून जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी शाळा परिसरात वृक्ष लागवड, सुसज्ज मैदान, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि शोष खड्डे निर्मितीचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्याशिवाय मल्टी युनिट शौचालय आणि कुंपन भिंतीच्या निर्मितीची गरजही अनेक शाळांनी प्रस्तावात नमूद केली आहे. या प्रस्तावानुसार आराखडा तयार करून त्यासाठी लागणाऱ्या निधीचा अंदाज प्रशासनाकडून घेतला जाणार आहे.
---------------
कोट: शासनाच्या परिपत्रकानुसार रोहयोच्या माध्यमांतून शाळांच्या परिसरात भौतिक सुविधांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. आजवर ७३५ शाळांपैकी ५६९ शाळांनी या अंतर्गत प्रस्ताव सादर केले असून, त्यांची पडताळणी रोहयो प्रशिक्षकांमार्फत केली जात आहे.
-गजाननराव डाबेराव,
प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. वाशिम