६३ पोलिस करतात २.५ लाख नागरिकांची सुरक्षा
By admin | Published: June 1, 2014 12:13 AM2014-06-01T00:13:39+5:302014-06-01T00:23:20+5:30
रिसोड शहरासह ६५ गावांच्या सुरक्षेचा गाडा हाकला जातो ६३ पोलिसांच्या भरवश्यावर.
अमोल कल्याणकर / रिसोड
कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असताना रिसोड पोस्टअंतर्गत अडीच लाख नागरिकांची सुरक्षा रिसोड पो.स्टे.तील केवळ ६३ पोलिसांच्या खांद्यांवर असल्याचे विसंगत चित्र आहे. रिसोड शहरासह ६५ गावांच्या सुरक्षेचा गाडा रिसोड पोलिस स्टेशन मार्फत हाकला जातो हे विशेष. २00९ मध्ये सदर पो.स्टे. अंतर्गत असलेल्या गावांची लोकसंख्या एक लाख ६७ हजार ९५0 होती. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस कर्मचार्यांची संख्या नगण्य आहे सन २0११ च्या जनगणनेनुसार या पोलिस स्टेशन अंतर्गत ६५ गावांची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात गेली. मात्र सन २00९ पासून पोलिस कर्मचार्यांच्या संख्येमध्ये वाढ झालीच नाही.ती उलट कमी झाली. सन २00९ मध्ये पोलिसांची संख्या ७४ होती.आज पोलिस कर्मचारी संख्येबाबत विसंगत चित्र पहावयास मिळत आहे. लोकसंख्या दीडपट वाढली असताना पोलिसांची संख्या कमी झाली आहे. २00९ मध्ये कार्यरत असलेल्या ७४ पोलिस पैकी १0 कर्मचार्यांची सन २0११ मध्ये जिल्हयात अन्यत्र बदली झाली. दोन पोलिस कर्मचार्यांना पोलिस सबइन्सपेक्टरपदी पदोन्नती मिळाली. एका कर्मचार्याने स्वेच्छा नवृत्ती घेतली तर दोन कर्मचारी नवृत्त झाले आहे.दोन कर्मचारी जिल्हयाबाहेर व दोन कर्मचारी महामार्ग सुरक्षा पथकात गेले. पाच वर्षाच्या कालखंडामध्ये १९ पोलिस कर्मचारी बाहेर गेल्याची नोंद आहे.केवळ ८ कर्मचारी येथे नविन देण्यात आले. वाढत्या लोकसंख्येनूसार एका पोलिस कर्मचार्यांवर ४ हजार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.