सीबीएसई बारावीचे ७१ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 11:53 AM2021-06-03T11:53:02+5:302021-06-03T11:53:07+5:30
71 students of CBSE XII pass without giving exams: जिल्ह्यातील दोन शाळांमधील ७१ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीप्रमाणेच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, १ जून रोजी जाहीर केला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील दोन शाळांमधील ७१ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. दरम्यान, पुढील प्रवेश नेमक्या कोणत्या आधारावर होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सीबीएसई बोर्डाने यापूर्वी इयत्ता दहावीची परीक्षादेखील रद्द केली. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली. दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका अजून कायम आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसई बारावीची परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीला घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असेल, असे सांगून या कठीण प्रसंगात त्यांना परीक्षेचा ताण देणे उचित ठरणार नाही. बारावीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्याआधारे जाहीर केला जाईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. या निर्णयानुसार जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय आणि भावना पब्लिक स्कूल या दोन शाळेतील ७१ विद्यार्थी हे परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत.
पुढील प्रवेशाचे काय होणार?
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ असणाऱ्या सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. बारावीनंतरचे वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य शाखेचे प्रवेश नेमक्या कोणत्या आधारे केले जातील, सीईटी परीक्षेचे स्वरूप कसे राहील, हे अद्याप निश्चित नाही. पुढील प्रवेश प्रक्रियेचे काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. पुढील प्रवेशासाठी सीईटी घेतली जाईल. ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने सीईटी घ्यावयाची, याचा निर्णय कोरोना परिस्थिती पाहून वरिष्ठ स्तरावर होऊ शकतो, असा अंदाज आहे.
- आर.जे. चंदनशीव
शिक्षण तज्ज्ञ तथा प्राचार्य नवोदय विद्यालय, वाशिम.