वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेचे ९६ हजारांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यात श्रावण बाळ निराधार योजनेचे ४६ हजार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे १८५०० आणि संजय गांधी निराधार योजनेच्या ३१ हजार ५०० लाभार्थींचा समावेश आहे. या निराधारांना त्यांचे मानधन कायम ठेवण्यासाठी वर्ष अखेर डिसेंबर महिन्यात हयातीचा दाखला संबंधित बँकेकडे सादर करावा लागतो. त्यामुळे दरवर्षी हजारो निराधार हयातीचा दाखला मिळविण्यासाठी विविध ठिकाणी पायपीट करतात. आता या दाखल्याचे स्वरूपच बदलण्यात आले आहे. दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर असलेले लाभार्थी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ही कागदपत्रे मिळविणे मोठे कठीण होणार आहे. त्यातच या संदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतेच मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने हजारो लाभार्थी याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे पुढे शासनाने फर्मान सोडल्यास हयातीच्या दाखल्याअभावी त्यांचे मानधन रखडून त्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती आहे.
-----------
कोट: शासनाने निराधारांना हयातीचा दाखला देण्यासाठी मुदत वाढविली आहे. नव्या स्वरूपातील दाखल्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही सुरू नसून, निराधारांसाठीच्या सर्वच योजनांतील लाभार्थींना निधी मिळताच त्यांचे मानधन तत्काळ अदा केले जात आहे. अद्याप कोणत्याच लाभार्थीचे मानधन दाखल्याअभावी थांबविण्यात आले नाही किंवा दाखला सादर करण्याची अटही घालण्यात आली नाही.
-शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.
-----------
कोट: गेल्या काही महिन्यांपूर्वी हयातीच्या दाखल्याअभावी आमचे मानधन थांबले होते. मी दोन वेळा दाखला सादर केल्यानंतर अधिकाऱ्यांकडे विनंती केली. तेव्हा कुठे मानधन सुरू झाले. आता नव्या स्वरूपातील दाखल्याबाबत आपणांस काहीच माहिती नाही. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला माहिती देऊन दाखला मिळविण्यासाठी मार्गदर्शन करावे आणि आमची परवड थांबवावी, अशी अपेक्षा आहे.
-कृष्णाबाई खैरे,
लाभार्थी, संजय गांधी निराधार
-------------------
बँक प्रशासन अनभिज्ञ
निराधार योजनांच्या लाभार्थीना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अर्जाचे स्वरूप बदलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे निराधारांना हे प्रमाणपत्र सादर करताना अनेक अडचणी येणार आहेत. त्यासाठी कोणती कागदपत्रे हवी, दाखला कसा मिळवावा, याबाबत कोणती माहिती देण्यात आली नाही. त्यातच यासंदर्भात बँकांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. बँकेचा हयातीच्या दाखल्याशी कोणताही संबंध नसून, तहसील कार्यालयाकडून निराधारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम प्रत्यक्ष लाभार्थीच काढू शकतो, असे सांगण्यात आले.