गाडी धुताना अचानक पाईपमध्ये विद्युत प्रवाह आल्यानं शॉक लागून कामगाराचा मृत्यू
By नंदकिशोर नारे | Published: October 6, 2022 01:17 PM2022-10-06T13:17:33+5:302022-10-06T13:18:07+5:30
दसऱ्याला वाहन धुत असताना पाईपमधे अचानक विद्युत प्रवाह आल्याने कामगाराला विजेचा धक्का बसला.
वाशिम : दसऱ्याला वाहन धुत असताना पाईपमधे अचानक विद्युत प्रवाह आल्याने कामगाराला विजेचा धक्का बसला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सुरज राजुलाल बरेटी (रा. हनुमान गड, जुनी नगर परिषद जवळ वाशिम) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना एका मोठ्या कार कंपनीच्या शोरूममध्ये ५ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता घडली.
वाशिम येथील या शोरूममध्ये सूरज बरेटी हा नियमित कामगार होता. दसऱ्यानिमित्त शोरूममध्ये कामगार आपल्या गाड्या धुण्याचे काम करत होते. सूरज गाडी धूत असताना पाईपमधे विद्युत प्रवाह आल्याने त्यात विजेचा जबर धक्का लागल्याने तो जमिनीवर कोसळला. उपस्थित असलेल्या कामगारांनी विद्युत प्रवाह बंद करून सूरजला ताबडतोब उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र सूरजची प्राणज्योत उपचाराअगोदरच मावळली.
सूरज याच्या मृत्यूमुळे शोरूममधील सर्व अधिकारी कर्मचारी व कामगार यांनी हळहळ व्यक्त केली. सूरजच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्याचे कुटुंबाला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. कामगार कायद्याअंतर्गत सूरजच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी सहकारी कर्मचारी अधिकारी प्रयत्न करत आहेत.