वाशिम जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये सुरु होणार 'आपले सरकार सेवा केंद्र'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:07 PM2020-10-31T12:07:00+5:302020-10-31T12:07:09+5:30
Washim News गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकाववर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नस कृती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीकापर्यंत शासकिय, निमशासकिय व खाजगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हीस सेंटर योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरीता जिल्ह्यातील ६१ रिक्त ठिकाणाकरीता २ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्ज मागविले आहेत.
अर्जांचा नमुना, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाच्या गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकाववर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच पात्र, अपात्र उमेदवारांची यादी, निवड यादी तसेच निवड प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा. जर त्या गावातील नागरीकाचा अर्ज आला नसेल त्यावेळी जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अजार्चा विचार करण्यात येईल. आपले सरकार सेवा केंद्राकरीता गावातील रहिवासीचा अर्ज प्राप्त झाल्यास लगतच्या गावातील अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसुचित ठिकाणीच चालवणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास, गंभीर स्वरुपाची चूक समजून, केंद्र रद्द करण्यात येईल. एक व्यक्ती फक्त एकाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करु शकतात. त्याच्या कुटुंबातून दुसरा अर्ज आल्यास तो ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच अगोदरपासून आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांचा अर्ज ग्राह्य धरता येणार नाही. अर्जामध्ये दिलेली माहिती चुकीची असेल तर त्याचा अर्ज रद्द करून संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला. एका केंद्राकरीता एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा घेणे, लेखी व तोंडी परीक्षेमध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास उच्च शैक्षणिक अर्हता किंवा अधिक वय किंवा यापेक्षा अन्य योग्य पयार्याचे आधारे उमेदवाराची निवड करणे याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती, वाशिम यांनी राखून ठेवले आहेत.