वाशिम : बंदुकीच्या गोळ्या झाडून एका ३३ वर्षीय युवकाची पांगरी कुटे (ता. मालेगाव) शिवारात हत्या करणाऱ्या तीन आरोपींना शुक्रवारी (दि. १७) वाशिम येथील न्यायालयात हजर केले असता, २३ सप्टेंबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पांगरीकुटे शेत शिवारात रस्त्यालतच्या एका शेतात माधव यशवंत पवार (रा. नागपूर) याचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता. घटनास्थळ व मृतदेहाची पाहणी करीत स्थानिक गुन्हे शाखा व मालेगाव पोलिसांनी तपासाला वेग दिला. नागपूर येथे ईथर ट्रेड एशिया या कंपनीअंतर्गत बिटकॉइनच्या व्यवसायात करोडो रुपयांची उलाढाल होत असे. या कंपनीत माधव पवार याच्याकडे व्यवहाराचा संपूर्ण हिशेब असल्याने त्याने बिटकॉइनच्या रकमेची हेराफेरी केली. त्यामुळेच त्याचे नागपूर येथून अपहरण करीत पांगरी कुटे शिवारातील एका शेतात बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. या प्रकरणात शुभम भीमराव कान्हारकर, विकल्प ऊर्फ विक्की विनोराव मोहोड, व्यंकेश ऊर्फ टोनी बिसन भगत अशा तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
०००००
आरोपींची कसून चौकशी
गोळीबार प्रकरणात आणखी किती आरोपींचा समावेश आहे, आणखी काही धागेदोरे मिळू शकतात का, या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुढील तपास करीत आहे.