लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ मधील कलम १०८ (अ) मधील तरतुदीनुसार वाशिम शहरात बुधवार, १० आॅक्टोबरपासून ‘नो पर्किंग’ नियमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. त्यानुषंगाने शहरातील मुख्य मार्ग, रहदारीची ठिकाणे व प्रमुख बाजारपेठेत दुचाकी वाहने उभी करण्यासाठी नियंत्रण रेषा आखून देण्यात आल्या असून त्याचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांविरूद्ध पहिल्याच दिवशी धडक कारवाई करण्यात आली.वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद यासह अन्य मुख्य कार्यालये शहरात वसलेली असल्याने विविध स्वरूपातील कार्यालयीन कामे व बाजारपेठेशी निगडित अन्य कामानिमित्त वाशिम शहराशी परिसरातील सुमारे १०० गावांचा दैनंदिन संबंध येतो. त्यामुळे याठिकाणी कायम नागरिकांची, वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. असे असताना मुख्य रस्त्यांवर मन मानेल त्या पद्धतीने वाहने उभी केली जायची. ही बाब लक्षात घेवून नगर परिषदेने ‘नो-पार्किंग’ची चोख अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेऊन त्याचा कंत्राट संबंधित अभिकर्त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, ‘नो-पार्किंग’ नियमाची अंमलबजावणी १० आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. शहरातील वाहतूक सुरळित राहण्याकरिता जुना गुरांचा बाजार येथील व्यापारी संकुलातील पार्किंगची खुली जागा, महात्मा फुले व्यापारी संकुलातील पार्किंगची खुली जागा आणि दिघेवाडी चौक, आंबेडकर चौक, पोलिस स्टेशन चौक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, शिवाजी चौक, बालू चौक, गोपाल टॉकीज, जुना रिसोड नाका, अकोला नाका आदीठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ असणार आहे. ठरवून दिलेल्या नियंत्रण रेषेच्या बाहेर वाहन आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल. वाहनधारकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
वाशिममध्ये नियंत्रण रेषेबाहेरील वाहनांवर धडक कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 2:47 PM