आठवडी बाजार भरल्यास ग्रामसेवकावर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:31+5:302021-03-04T05:17:31+5:30
जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण हा ग्रामीण भागात आढळला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख ...
जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण हा ग्रामीण भागात आढळला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख उंचावला होता. त्यानंतर जानेवारी २०२१ पर्यंत कोरोनाबाधितांचा आलेख खाली आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा आलेख पुन्हा उंचावला असून, गत १५ दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या चांगलीच वाढली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील सर्व आठवडी बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी मनाई केली आहे. यानंतरही काही ठिकाणी आठवडी बाजार भरत असल्याची माहिती समोर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही गावात आठवडी बाजार भरवले जाणार नाहीत, याची खबरदारी जिल्हा परिषदेने घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. संबंधित गावात आठवडी बाजार भरणार नाही, याची जबाबदारी संबंधित ग्रामसेवकावर सोपविली असून, आठवडी बाजार भरल्यास संबंधित ग्रामसेवकाला जबाबदार धरून कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.