वाशिम जिल्ह्यात ६२९ मतदारांचे वय वर्षे १००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:28 AM2021-02-02T11:28:07+5:302021-02-02T11:28:22+5:30
Washim News अंतिम मतदार यादी अलीकडेच प्रसिद्ध झाली असून, ६२९ मतदारांनी वयाची शंभरी पार केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी अलीकडेच प्रसिद्ध झाली असून, ६२९ मतदारांनी वयाची शंभरी पार केली आहे.
निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेंतर्गत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक, युवतींचे नाव मतदारयादीत समाविष्ट करणे तसेच मयत, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येतात. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तसेच ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तहसील व निवडणूक विभागातर्फे जनजागृतीदेखील करण्यात आली. जिल्ह्यात ९ लाख ५८ हजार ४० अशी मतदारसंख्या असून, यामध्ये सन २०२० मधील १९ हजार ९२० नवमतदारांचा समावेश आहे. निवडणूक विभागाकडे वयोगटानुसार मतदारांचा लेखाजोखा असून, जिल्ह्यात ६२९ मतदारांनी वयाची शंभरी पार केली आहे. वाशिम तालुक्यात वयाची शंभरी पार केलेले मतदार सर्वाधिक १९९ तर सर्वात कमी मतदार मानोरा तालुक्यात ६० आहेत.
जिल्ह्मात मतदार नोंदणी अभियान राबविण्यासाठी तहसिल स्तरावरील निवडणूक विभाग आणि ‘बीएलओ’ यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
१९९२० नवमतदार
सन २०२० मध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक, युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १९ हजार ९२० नवमतदारांनी नोंदणी केली आहे. या नवमतदारांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्कदेखील बजावला आहे.