वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोला जिल्हा परिषदेने कोविड केअर सेंटर उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला; याच धर्तीवर वाशिम जिल्हा परिषदेनेदेखील कोविड केअर सेंटर उभारून ग्रामीण रुग्णांना दिलासा का देऊ नये, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले असतानाही तेथे अद्याप कोणत्याच सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले तर त्यांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते. वाशिम जिल्हा कोविड हॉस्पिटल व कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचा अपवादवगळता एकाही सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार किंवा ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे गोरगरीब व ग्रामीण भागातील रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे. ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडे जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य शासकीय इमारती उपलब्ध आहेत. मनुष्यबळही बऱ्यापैकी उपलब्ध होणारे असल्याने जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद हे ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असल्याचे दाखवून देण्याची ही संधी आहे. अकोला जिल्हा परिषदेने कोविड केअर सेंटर उभारले; मग वाशिम जिल्हा परिषद का उभारू शकत नाही, असा प्रश्नही ग्रामीण जनतेमधून उपस्थित होत आहे.
०००
बॉक्स
ग्रामीण भागात गृहविलगीकरणात राहणे कठीणच !
सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना घरातच विलगीकरणात ठेवले जाते. परंतु, त्यासाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृह असणे आणि डॉक्टरांची सेवा सहज उपलब्ध होण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील चित्र पाहता स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृह आदी अटी पूर्ण होणे जवळपास ९५ टक्के रुग्णांना शक्यच नाही. तरीही अनेक रुग्ण गृहविलगीकरणात असल्याची नोंद आहे. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले तर ग्रामीण रुग्णांची सोय होईल; याशिवाय कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविणेही सुलभ होईल, असा सूर उमटत आहे.
०००००
जिल्हा परिषद सदस्यांचीही मागणी
जिल्हा परिषदेने कोविड केअर सेंटर उभारावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांमधूनही समोर येत आहे. अनसिंग गटाचे सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी स्वत:च्या शैक्षणिक संस्थेच्या ४० वर्गखोल्या देण्याची तयारीही यापूर्वीच दर्शविली होती. मात्र, त्यांच्या या मागणीची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली नाही. आता कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही वाढत असल्याने जिल्हा परिषदेने कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पांडुरंग ठाकरे यांच्यासह इतर सदस्यांनी केली.