धनज परिसरातील जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:37 AM2021-04-26T04:37:56+5:302021-04-26T04:37:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धनज बु. : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु. : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्ववभूमीवर धनज परिसरातील आठ सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
धनज बु. हे गाव वाशिम जिल्ह्याच्या टोकावरील सर्वात शेवटचे गाव असून, धनज परिसरातून अमरावतीकडे जाण्यासाठी पाच मार्ग आहेत. यातील मुख्य ढंगारखेड (कारंजा अमरावती मार्ग) तपासणी नाका तर अन्य चार (साखरा मार्ग, वाढोणा रामनाथ मार्ग, राजना काजना मार्ग, तारखेड मार्ग) अशा पाच सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच अकोला जिल्ह्याला लागून असलेल्या शिवण बु. मार्ग, अकोली मार्ग धोत्रा जहंगीर मार्ग आणि माना कुरुम मार्गही बंद करण्यात आले आहेत. तर दुसरी मुख्य सीमा ही वाशिम - यवतमाळ मार्गावरील दोनद बु. येथील असून, तिथे पोलिसांचा तपासणी नाका लावण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. धनज पोलीस स्थानकांतर्गत ढंगारखेड व दोनद बु. येथील मार्गावर तपासणी नाका सुरु केल्यापासून केवळ अत्यावश्यक वाहनांना चौकशी करुन सोडण्यात येत आहे. अन्य आठ ठिकाणांवरील सीमांवर पोलीसपाटील, ग्राम सुरक्षा दल, पोलीस मित्र यांच्या माध्यमातून दिवसा व रात्री बंदोबस्त नेमून रस्ता बंद करण्यात आला आहे. याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्र यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच तपासणीच्या ठिकाणी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व विजेची व्यवस्था धनज पोलिसांकडून करण्यात आली आहे.