पोषण आहारातून कडधान्याबरोबरच मुलांना मिळतेय डाळ, तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 12:28 PM2021-02-03T12:28:46+5:302021-02-03T12:29:08+5:30
कडधान्याबरोबरच डाळ व तांदळाचेही वाटप घरपोच केले जात असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सरकारी व खासगी अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कडधान्याबरोबरच डाळ व तांदळाचेही वाटप घरपोच केले जात असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशातून शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. दरम्यान, २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कडधान्य, डाळ व तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात पहिली ते पाचवीचे एकूण ७३ हजार ७७५ आणि सहावी ते आठवीचे ५१ हजार ९१२ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जात आहे.
घरपोच आहार
शाळेतील विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळेतच आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जातो. देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या. दरम्यान कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार वाटप करण्यात आले. आताही विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे साहित्य घरपोच वाटप करण्यात येत असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.