००००
अर्धे शटर उघडे ठेवून व्यवहार !
वाशिम : वाशिम शहरातील अत्यावश्यक सेवेत न मोडणाऱ्या अनेक दुकानांचे अर्धे शटर उघडे ठेवून सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यवहार सुरू असल्याचे शुक्रवारी दिसून आले. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
००००
स्वच्छतेचा बोजवारा
वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१९ मध्ये जनजागृती करीत उघड्यावरील शौचास जाणाऱ्यांवर कारवाई केली होती. यंदा कोरोनामुळे कारवाईची मोहीम प्रभावित झाल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.
००००
११ वाहनांवर कारवाई
वाशिम : जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनचालकांना मास्क लावणे बंधनकारक केले असतानाही गुरुवारी अनसिंग-पुसद मार्गावर १२ चालक विनामास्क आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
००
ग्रामस्तरीय समित्यांना मार्गदर्शन
वाशिम : जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामस्तर समितीची स्थापना करण्यात आली आहे. या ग्रामसमित्यांना त्यांच्या जबाबदारीबाबत गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले.
००
ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रश्न प्रलंबित
वाशिम : स्थानिक डम्पिंग ग्राउंडवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था उभारण्यात आली आहे; मात्र अद्याप त्या ठिकाणी हे काम सुरू झालेले नाही.
००
वळणरस्ता ठरतोय धोकादायक
वाशिम : रिसोड येथून जवळच असलेल्या मोरगव्हाण सिंचन तलावानजीक तयार झालेल्या वळण रस्त्याला तलावाच्या बाजूने कठडे उभारण्यात आलेले नसल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत आहे.
००
शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित !
वाशिम : जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रक्कमा आधार क्रमांक लिंक न केल्याने वा इतर त्रुटीमुळे प्रलंबित आहेत, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
००
प्रतिबंधित क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत दोन दिवसांत प्रतिबंधित क्षेत्रातील ५०० घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी केली असून, रुग्णांनीदेखील दुखणे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००००
आरोग्य चमू केनवडमध्ये दाखल
वाशिम : रिसोड तालुक्यातील केनवड येथे शुक्रवारी १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य चमू गावात दाखल झाला. संदिग्ध रुग्णांचे स्रावनमुने घेतले जात आहेत.