लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात आणखी एका जणाचा मृत्यू तर सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ फेब्रुवारी रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ७,१७६ वर पोहोचली आहे. दरम्यान, १६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहेत. कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद बुधवारी घेण्यात आली. बुधवारी (दि. ३) एकूण सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये मालेगाव शहरातील १, करंजी येथील १, उमरदरी येथील १, चोंडी येथील १, मंगरुळपीर शहरातील दत्त मंदिराजवळील १, कारंजा शहरातील वनदेवी नगर येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,१७६ वर पोहोचला आहे. बुधवारी १६ जणांना रुग्णालयातून सुटी झाली. आतापर्यंत कोरोनामुळे १५५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी वाशिम शहरात कुणीही कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले नाही. त्यामुळे शहरवासीयांना तूर्तास दिलासा मिळत आहे. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
वाशिम जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; सात कोरोना ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 12:03 PM