अँट्रॉसिटी रद्द नव्हे, बदल करण्याची मागणी!
By admin | Published: September 24, 2016 02:15 AM2016-09-24T02:15:45+5:302016-09-24T02:15:45+5:30
वाशिम येथे सकल मराठा समाजातील युवतींची पत्रकार परिषदेत माहिती.
वाशिम, दि. २३- 'मराठा क्रांती मोर्चा'हा कोणत्याही जाती, धर्म, व्यक्ती, संस्था, पोलीस, प्रशासन किंवा शासनाच्या विरोधात नसून, अत्याचार व नराधम प्रवृत्तीच्या विरोधात आहे. काही जण मोर्चाबाबत गैरसमज पसरवित आहेत, त्या अफवांना बळी पडू नका, तसेच मोर्चा हा अँट्रॉसिटी रद्द करण्यासाठी नसून, त्याचा होत असलेला गैरवापर टाळण्याकरिता त्यामध्ये बदल करण्याच्या मागणीसाठी असल्याची माहिती सकल मराठा समाजातील युवतींनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक तुर्के कॉम्प्लेक्सस्थित सकल मराठा मूक मोर्चा कार्यालयात २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सकल मराठा समाजातील युवतींनी मोर्चासंदर्भात पसरविल्या जाणार्या गैरसमजाबाबत व नियोजनाबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी मोर्चातील प्रमुख मागण्यांबाबत सांगितले, की कोपर्डी येथील मुलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि अमानवीय पद्धतीने झालेल्या हत्येच्या निषेधार्थ समाजमनाच्या तीव्र भावना शांततेने आणि संयमाने व्यक्त करण्यासाठी आहे. यापुढे कोणीही असे कृत्य करू नये, त्याला धडकी भरावी, यासाठी हा मोर्चा आहे. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण लागू करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नाशिक येथील बलात्कार प्रकरणातीलही आरोपींना ताबडतोब शिक्षा व्हावी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या आहेत. या मोर्चाच्या दिवशी कोणत्याच प्रकारचे शहर बंद ठेवण्याचे आवाहनसुद्धा आयोजकांनी केलेले नाही. स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून जे मोर्चात सहभागी होतील त्यांचे स्वागतच आहे. मोर्चाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले असून, सकल मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती, महिला, युवतींनी यामध्ये सहभागी होऊन अपप्रवृत्तीबद्दल रोष दाखविण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजातील महिला, युवती व पुरुषांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता.
मोर्चा नियोजनाबाबत..
सकल मराठा समाजाचा मोर्चा हा पूर्णपणे शांततेने, आपसातही न बोलता काढायचा आहे. मोर्चात सर्वात आधी महिला, तरुणी, विद्यार्थिनी असतील. त्यांच्यामागे सर्व पुरुष अशी रचना आहे. मोर्चा हा संपूर्ण समाजाचा असल्याने कोणीही नेता किंवा प्रमुख नाही. मोर्चामध्ये एकजूट दाखविण्यासाठी सर्व बांधवांनी आपल्या संपूर्ण परिवारासह व नातेवाइकांसह उपस्थित रहावे. विशेष म्हणजे मोर्चादरम्यान कोणालाही अडथळा होऊ नये, याकरिता मोर्चादरम्यान अंत्ययात्रा, रुग्णवाहिका, शववाहिका, अत्यावश्यक सेवा, पोलीस आणि प्रशासनाची वाहने यांना प्राधान्याने विनाअडथळा मार्ग मोकळा करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील चोहोबाजूंनी मोर्चातील गर्दी वाढण्याची शक्यता पाहता सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
मोर्चा यशस्वी करण्याकरिता व देखरेखीसाठी सकल मराठा समाजातील युवकांच्या २५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मोर्चासाठी २0 हजार फलक, २0 हजार काळे झेंडे, प्रत्येकाला पुरतील एवढे काळया फितीचे नियोजन आहे. मोर्चात २0 रुग्णवाहिका, १0 महिलांसाठी स्वच्छतागृह, ७ हजार पुरुष व एक हजार महिला स्वयंसेवक, २0 लाख पाण्याचे पाऊच, मोर्चा मार्गावर २२५ ध्वनिक्षेपक, १0 स्क्रिन असून, मोर्चाचे नेतृत्व मुली करणार आहेत.