लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतले. त्याचा समारोप ३१ डिसेंबरला होत असून यादिवशी व्यसनविरोधी रॅली काढून मावळत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाणार असून नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.३१ डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्य प्राशन करून धुडगुस घालतात. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविली जातात. यामुळे अपघात घडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापुर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे हे टाळण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात व्यसनविरोधी मेळावे घेवून ‘अनिंस’ने जनजागृती केली. त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबरला वाशिम शहरात दारूच्या प्रतिकात्मक बाटलीला महिलांच्या हस्ते चपलांचा हार घालून रॅली काढली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी.एस. खंदारे, प्रा. यू.एस. जमधाडे, प्रा. ए.पी. राऊत, प्रा. ए.टी. वाघ, पी.एन. संधानी, डॉ. रामकृष्ण कालापाड, डॉ. विक्रम चौधरी, राजू दारोकार, प्रा. सुभाष अंभोरे, प्रा. हरीदास बनसोड, विनोद तायडे, गजानन धामणे, दिनकर बोडखे, प्रा. ऊन्मेश घुगे, अॅड. दिपाली सांबर आदिंनी केले आहे.
व्यसनविरोधी रॅलीने दिला जाणार मावळत्या वर्षाला निरोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 6:19 PM