सर्वच पक्षाच्या इच्छुकांचे अर्ज; उमेदवारी मागे घेणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:34+5:302021-09-19T04:41:34+5:30
संतोष वानखडे वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीमुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून, सर्व पक्षाच्या इच्छुकांनी अर्ज दाखल ...
संतोष वानखडे
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीमुळे राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून, सर्व पक्षाच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले असल्याने, उमेदवारी मागे कोण घेणार, बंडखोरी तर होणार नाही ना? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दरम्यान, अद्याप वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडीचा अपवाद वगळता उर्वरीत कोणत्याही पक्षाची युती झालेली नाही. ऐनवेळी दगाबाजी नको म्हणून सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. २१ सप्टेंबरला वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून, २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. युती, आघाडीचे ठरले नसल्याने तूर्तास तरी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारकार्य सुरू ठेवल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेत वरचढ ठरू शकणाऱ्या उमेदवाराचा पोटनिवडणुकीत पराभव कसा करायचा? या अनुषंगाने काही ठिकाणी ‘डमी’ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे ऐनवेळी दिग्गज उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागल्यास नवल वाटायला नको, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
......................
पाडापाडीचे डावपेच कुणाचा करणार गेम?
जिल्हा परिषदेतील संभाव्य पक्षीय बलाबल, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाचे संभाव्य प्रबळ दावेदार ठरू शकतील अशा काही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे हितचिंतकांची चिंता वाढली असून, प्रबळ दावेदार ठरू पाहणाऱ्या उमेदवाराला मतविभाजनाच्या माध्यमातून पराभूत कसे करता येईल? या अनुषंगानेदेखील काही ठिकाणी उमेदवार उभे केल्याची चर्चा आहे. पाडापाडीच्या या डावपेचात कुणाचा गेम होणार? याकडे दिग्गजांचे लक्ष लागून आहे.
०००००००
जि. प. गट व पं. स. गणासाठी वैध अर्ज
तालुका गट गण
वाशिम ३८ ४८
रिसोड १८ ३१
मानोरा १८ ३३
कारंजा ७ २६
मालेगाव १३ ३५
मं. पीर २८ २३