लोककलावंतांच्या मानधनाला मंजुरी द्या; अन्यथा आंदोलन - विदर्भ लोककला मंचचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 07:53 PM2018-01-11T19:53:50+5:302018-01-11T20:07:21+5:30
वाशिम - वृध्द लोक कलावंत समितीच्या वार्षिक बैठकीवरील स्थगिती उठवून लोककलावंतांना मानधन मंजुर करण्याचे मागणी विदर्भ लोककला मंचच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष संजय इंगळे यांच्या नेतृत्वात जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्र्यांना निवेदन पाठवून, या मागणीसाठी येत्या २५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेवर लोक कलावंतांच्या धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

विदर्भ लोककला मंचकडून असा युक्तीवाद करण्यात आला आहे की, शाहीर, शिवशाहीर, भिमशाहीर, गायक, गीतकार, भजनी कलावंत, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गोंधळी, भराडी, बंजारा, नाथजोगी इत्यादी पारंपारिक लोककलावंत आयुष्यभर जनजागृती राष्ट्रीय एकात्मता व समाजप्रबोधन करीत असतात. प्रबोधन करुनही त्यांची झोळी सदैव रिकामीच असते. या कलावंतांना शासनाने समाजकल्याण विभागामार्फत वृध्द साहित्यीक कलावंत मानधन समितीच्या माध्यमातून निवृत्ती वेतन योजना सुरु केली आहे. मात्र पालकमंत्री यांच्याकडे खोट्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे शासनाने या समितीच्या वार्षिक बैठकीवर स्थगिती आणली आहे. मात्र बालपणापासुन वृध्दापकाळापर्यंत समाजाला समर्पित असलेल्या लोककलावंतांची उपासमार लक्षात घेवून वृध्द साहित्यीक कलावंत समितीची २०१७ च्या वार्षिक बैठकीवरील बंदी उठवावी व पालकमंत्र्यांनी आपल्या उपस्थितीतच वृध्द साहित्यीक कलावंत समितीची बैठक घेवून तळागाळातील, ग्रामीण भागातील, दारिद्क्चय रेषेखालील गरजु व योग्य अशा स्त्री, पुरुष लोकांना समसमान वाटा देवून कलावंत मानधन मंजुर करुन लाभार्थ्यांची निवड करावी व दुर्धर आजारग्रस्त व गरजु कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. तसेच येत्या सोमवार, २५ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर विदर्भ लोककला मंच नागपूरचे अध्यक्ष दत्तराव धांडे यांच्या मार्गदर्शनात धरणे आंदोलन राबवून लोककलावंतांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येईल. असे जिल्हाध्यक्ष संजय इंगळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.