अरूणावती नदीचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 03:22 PM2019-11-18T15:22:09+5:302019-11-18T15:22:53+5:30
उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : मानोरा तालुक्यातील जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या अरूणावती नदीत परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला; मात्र गेट बंद न केल्याने हे पाणी वाहून जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ नोव्हेंबरच्या अंकात छायाचित्रासह प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन लघूसिंचन विभागाने पाणी अडविण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. यामुळे उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
अरूणावती नदीवर ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांना लोखंडी गेट देखील आहेत. पावसाळ्यानंतर नदीपात्रात असणारे पाणी उन्हाळ्यात शेतीकरिता तसेच जनावरांना पिण्यासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी बंधाºयाला गेट लावून पाणी अडविले जाते. यावर्षी मात्र नदीपात्रातील पाणी अडविण्यास विलंब झाला. याबाबत ‘लोकमत’ने १४ नोव्हेंंबरच्या अंकात छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन लघुसिंचन विभागाने कोल्हापुरी बंधाºयाचे गेट बंद करून पाणी अडविण्यास सुरूवात केली.
तालुक्यातील साखरडोह, जवळा, हिवरा बु., कोंडोली, धामणी, मानोरा, रामतिर्थ, कारखेडा आदी नदीकाठच्या गावात कोल्हापूरी बंधारे असून पाणी अडविले जात असल्याने उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.