माहिती देण्यास टाळाटाळ; कर्मचारी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:37 AM2021-04-26T04:37:53+5:302021-04-26T04:37:53+5:30
रिसोड शहरात अनेक ठिकाणी तसेच कॉलनीमध्ये कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना गृहविलगीकरणात राहण्यास सांगणे ...
रिसोड शहरात अनेक ठिकाणी तसेच कॉलनीमध्ये कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना गृहविलगीकरणात राहण्यास सांगणे आदी प्रक्रिया कराव्या लागतात. परंतु कर्मचारी संबंधित रुग्णाच्या घरी गेले असता त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करतात. खासगी रुग्णालयांमध्ये जाणार आहोत, अशी खोटी माहिती देऊन घरी येऊ नका, शेजारच्यांना हा विषय माहीत होतो, त्यामुळे दूरध्वनी क्रमांकावर माहिती देत जा, असे रुग्णांकडून सांगितले जात आहे. काही रुग्ण तर आम्हाला काही झाले नाही आम्ही ठणठणीत आहोत, अशी माहिती देऊन त्यांना माघारी जाण्यास सांगतात. काहीजण अरेरावीची भाषा करून कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषेत बोलतात. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबातील रुग्ण पॉझिटिव्ह निघाला असल्यास त्या संपूर्ण कुटुंबांनी गृहविलगीकरण केले पाहिजे. हेसुद्धा अनेक जण करत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
०००
सर्व नियमांचे पालन केले तर कोरोना रुग्ण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यास योग्य ती मदत केली, तर हा संसर्ग कमी होऊन शहरात रुग्णांची संख्या वाढणार नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मदत करावी.
विजयमाला आसनकर
नगराध्यक्ष, नगर परिषद, रिसोड