तेरवीचा खर्च टाळून दिव्यांग बालकांना अन्नदान
By admin | Published: September 22, 2016 01:20 AM2016-09-22T01:20:13+5:302016-09-22T01:20:13+5:30
अजयसिंह ठाकूर यांनी निर्माण केला आदर्श; परंपरागत चालीरिती व रुढीला दिला फाटा.
वाशिम, दि. २१- अनादी काळापासून चालत आलेल्या रुढी, परंपरांना फाटा देत स्थानिक शुक्रवारपेठ भागातील महाराणा प्रताप चौकातील रहिवासी युवक अजयसिंह ठाकूर यांनी आपले वडील स्व. गिरधरसिंह ठाकूर यांच्या तेरवीचा कार्यक्रम न करता तेरवीच्या दिवशी अंध, दिव्यांग बालकांना अन्नदान करुन वेगळा पायंडा पाडला.
सामाजिक कार्यकर्ते व राणा मित्रमंडळाचे अध्यक्ष अजयसिंह ठाकूर यांचे वडील गिरधरसिंह ठाकूर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. हिंदू संस्कृतीत व्यक्तीच्या निधनानंतर काही धार्मिक सोपस्कार पार पाडणे गरजेचे असल्याचे मानले जाते. प्रत्यक्षात आप्तेष्ट जिवंत असताना त्यांच्या आरोग्यावर, खाण्या-पिण्यावर खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहणारे व्यक्ती त्यांच्या निधनानंतर मात्र तेरवीसारख्या कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणात खर्च करतात. याला अपवाद ठरत अजयसिंह ठाकूर यांनी वडिलांच्या तेरवीचा कार्यक्रम न करता २0 सप्टेंबरला गोबरा नाईक अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान केले. या अन्नदान कार्यक्रमामध्ये अजयसिंह ठाकूर यांच्या समाजपयोगी कार्यात प्रत्यक्ष सहभाग देत त्यांचे मोठे भाऊ संजयसिंह ठाकूर, चेतनसिंह चौहान, दिलीपसिंह राजपूत, राधेश्यामसिंह ठाकूर, मुकेशसिंह ठाकूर, महादेव हरकळ, अशोक धोंगडे, गोविंदसिंह तोमर, पुरुषोत्तम धोंगडे, राहुल तुपसांडे, गणेश कांबळे, शुभम चौहान, अमित ठाकूर, जफर मिस्त्री यांच्यासह राणा मित्र मंडळ व राजपूत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले.