वाशिम : गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून रुग्णवाहिकांसाठी मार्गावर विशेष दक्षता घेतली जाते; परंतु जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातच प्रवेश केल्यानंतर विविध मार्गांवर अस्ताव्यस्त रुग्णवाहिकेला विविध मार्गांवर अडथळे येतात. त्यामुळे बऱ्याचदा रुग्ण प्रत्यक्ष उपचाराखाली येण्यास विलंब होतो. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानादरम्यानच हा प्रकार मंगळवारी पाहायला मिळाला.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. हे अभियान महिनाभर म्हणजेच १७ फेब्रुवारीपर्यंत राबविले जाणार असून, या अभियानात पर्यावरण सुरक्षा, अपघात सुरक्षा, वाहतूक नियमन आदींवर भर देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्याचे नियोजनही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. आता प्रत्यक्ष या अभियानांतर्गत कोणत्या वाहनांवर कारवाई होते, वाहतुकीची स्थिती काय, हे पडताळले असता गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यासाठी धडपड करणाऱ्या रुग्णवाहिका चालकालाच अस्ताव्यस्त वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाल्याचे चित्र निर्माणाधीन उड्डाणपूल, पुसद नाका, पोस्ट ऑफिस चौक दरम्यान दिसून आले. त्यामुळे अवघ्या एक किलोमीटर अंतराचा रस्ता ओलांडून रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेला तब्बल २० मिनिटांचा वेळ लागला. विशेष म्हणजे यादरम्यान वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न करण्यासाठी कोणताही वाहतूक पोलीस किंवा उपप्रादेशिक परिवहन विभागाचा कर्मचारी चौकात नसल्याचेही दिसून आले. अशा प्रकारातून रुग्णवाहिकेला रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला, तर रुग्णाचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.
---------------------
वाहतूक नियमनासाठी विशेष नियोजन
शहरांतून जाणाऱ्या महामार्गासह उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. शिवाय अकोला-हिंगोली या रस्त्याची अवस्थाही वाईट आहे. त्यामुळे आधीच वाहनचालकांना जणू अडथळ्यांची शर्यतच पार करण्याची कसरत करावी लागते. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे रुग्णवाहिकेला वारंवार अडथळा निर्माण होतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पुसद नाका-पोस्ट ऑफिस चौकादरम्यान वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन केले जात आहे. दरम्यान, रस्ता सुरक्षेच्या पहिल्या दोन दिवसांत सोमवार आणि मंगळवारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी, रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण झाल्याबाबत कोणालाही दंड आकारण्यात आला नसल्याचे यासंदर्भातील माहितीवरून स्पष्ट झाले.
----------------------
कोट: उड्डाणपुलाचे काम अर्धवट आहे. तेथे गेट बंद असल्याने अर्धा तास थांबावे लागते, तर पुढे रस्त्याची अवस्था वाईट असताना पुसद नाका चौक, पोस्ट ऑफिसदरम्यान अस्ताव्यस्त वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होऊन रुग्णालयात पोहोचण्यास २५ मिनिटांचा वेळ लागतो. एखादवेळी यातून रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची भीती आहे.
------------
कोट: पुसद नाका चौक, पोस्ट ऑफिसदरम्यान वाहतूक पोलीस नियुक्त केले असून, हे सर्व कर्मचारी वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमित दंडात्मक कार्यवाही करीत आहेत. रुग्णवाहिकेला अडथळा होऊ नये, यासाठी ते विशेष काळजी घेतात. यापुढेही अधिक दक्षता बाळगून कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांना देण्यात येतील.
-नागेश मोहोड
पोलीस निरीक्षक
जिल्हा वाहतूक शाखा