नादुरुस्त बस ठरताहेत जीवघेण्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:26 PM2019-11-26T14:26:52+5:302019-11-26T14:27:04+5:30
सोमवारी वाशिममार्गे अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मेडशी (ता.मालेगाव) या गावानजिक ‘ब्रेक’ निकामी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ४ एस.टी. आगार आणि २ उपआगार असून याअंतर्गंत २५० पेक्षा अधिक एस.टी. बसेस दैनंदिन रस्त्यावर धावतात; मात्र त्यातील अधिकांश बसेस नादुरुस्त राहत असून प्रवासादरम्यान बस बंद पडण्याच्या प्रकाराला प्रवासी पुरते वैतागले आहेत. सोमवारी वाशिममार्गे अकोलाकडे जाणाऱ्या बसचे मेडशी (ता.मालेगाव) या गावानजिक ‘ब्रेक’ निकामी झाले. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. याचदिवशी वाशिमच्या भर चौकात वाशिम-रिसोड ही बस नादुरूस्त झाल्याने प्रवाशांना दुसºया पर्यायी बसने प्रवास करावा लागला.
‘प्रवाशांच्या सोयीसाठी’, हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाºया राज्य परिवहन महामंडळाचा कारभार मात्र जुन्याच एस.टी. बसेसच्या माध्यमातून सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरूळपीर हे चार आगार असून मालेगाव उपआगाराचा कारभार वाशिम; तर मानोरा उपआगाराचा कारभार मंगरूळपीर आगारातून चालतो. आजमितीस चारही आगारांकडे असलेल्या बहुतांश एस.टी. बसेस जुनाट झाल्या असून प्रवासादरम्यान टायर पम्चर होण्यासह अन्य स्वरूपात अचानक बिघाड होऊन बस मध्येच बंद पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वाशिममार्गे अकोलाकडे जाणाºया एम.एच. १४ बी.टी. ४७५८ या उमरखेड-शेगाव बसचे ‘ब्रेक’ मालेगाव तालुक्यातील मेडशी गावानजिक अचानक निकामी झाले. यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टीनशेडमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सुदैवाने या घटनेत एक प्रवासी जखमी होण्याचा अपवाद वगळता अन्य कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याचदिवशी वाशिम आगारातून रिसोड येथे जाणारी एम.एच. ४० एन. ८९४३ या क्रमांकाची वाशिम-रिसोड बस पाटणी चौक ते आंबेडकर चौक मार्गावर भर रस्त्यात नादुरूस्त झाल्याने वाहकाने सर्व प्रवाशांना बसखाली उतरून दिले. मागून येत असलेल्या दुसºया बसचा पर्याय मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय टळली; मात्र यासारख्या घटनांमुळे एस.टी.च्या प्रवासाला नागरिक कंटाळल्याचा सूर सर्वच स्तरातून उमटत आहे.
१० ते १२ लाख किलोमिटर किंवा १० वर्षापर्यंत एस.टी. बस चालवावी लागत असल्याचा नियम आहे. आगारांतर्गत धावणाºया एस.टी. बसेसला आजमितीस १० वर्षे पूर्ण होत असून गत पाच वर्षांपासून नव्याने एकही बस मिळालेली नाही. त्यामुळे जुन्याच बसेसवर कारभार हाकावा लागत आहे. दुसरीकडे रस्ते प्रचंड खराब झाल्याने १ लाख किलोमिटर प्रवासानंतर बदलावा लागणारा टायर सद्या १० ते १२ हजार किलोमिटरपर्यंतच चालत असून कर्मचारीही हैराण झाले आहेत.
- विनोद इलामे, आगार व्यवस्थापक, वाशिम