डॉ. बाहेती यांचे प्राथमिकपासून दहावीपर्यंतचे शिक्षण मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. ‘व्ही.आर.सी. ई’मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी बिट्स पिलानी येथे एम.ई. केले. ओखलोहोमा विद्यापीठात एमएस आणि डॉक्टरेट पदवी मिळविल्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे त्यांनी नॅशनल सायन्स फाऊंडेशनचे प्रमुख म्हणून कार्य केले. ४२ किलोमीटरच्या वॉशिंग्टन मॅरेथॉनमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतल्याने त्यांना मध्यंतरी गौरविण्यात आले. उत्कृष्ट गुंतवणूकदार म्हणूनही वॉशिंग्टन पोस्ट या संस्थेने त्यांना पुरस्कृत केले होते. भारतीय अध्यात्म आणि भगवद्गीतेचे ते गाढे अभ्यासक होते. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपले मूळ गाव मंगरूळपीर येथील अनेक सामाजिक संस्थांना भरीव आर्थिक मदत केली. अशात ११ मार्च रोजी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पद्मा, मुलगा राजीव आणि मुलगी शिला, अर्पणा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या मृत्यूने मंगरूळपीरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगरूळपीर येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ बाहेती यांचे अमेरिकेत निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 5:16 AM