शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या ‘आॅनलाइन’ कार्यवाहीला सुरुवात
By admin | Published: May 1, 2017 02:17 AM2017-05-01T02:17:02+5:302017-05-01T02:17:02+5:30
वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीप्रकरणी शासनाच्या स्पष्ट सूचना आल्याने, आता त्या अनुषंगाने आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीप्रकरणी शासनाच्या स्पष्ट सूचना आल्याने, आता त्या अनुषंगाने आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ८०० शाळा असून, या शाळांवर तीन हजारांच्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद होती. आता ही प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू झाली असून, आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक प्राथमिक शिक्षकांकडून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यात ५ मे ते ७ मे या दरम्यान रिसोड, वाशिम, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. यापूर्वी आंतरजिल्हा बदलीचे अर्ज प्रलंबित असलेल्या शिक्षकांनीदेखील नव्याने आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे सरल प्रणालीवरील नोंदी अर्ज भरण्यापूर्वी अद्ययावत करण्याची संपूर्ण जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. इच्छुक शिक्षकांनी निर्धारित वेळेत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन सीईओ गणेश पाटील, शिक्षणाधिकारी दिनकर जुमनाके, उपशिक्षणाधिकारी मानकर यांनी केले आहे.