लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य शासनाने निर्बंध कठोर करतानाच दारिद्र्यरेषेखालील तसेच प्राधान्य गटातील कुटुंबाला एका महिन्यासाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील पात्र लाभार्र्थ्यांना १ मेपासून रेशनच्या मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील अंत्योदयचे ४८ हजार ९७० आणि प्राधान्य गटातील एक लाख ८१ हजार १०९ अशा एकूण दोन लाख ३० हजार ७९ कुटुंबांना याचा लाभ मिळेल.
गतवर्षी लॉकडाऊनदरम्यान अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्र्थ्यांना मोफत धान्याचा लाभ देण्यात आला होता. यंदादेखील कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने संचारबंदीचे निर्बंध आणखी कठोर केले आहेत. या दरम्यान गोरगरीब लाभार्र्थ्यांना दिलासा म्हणून रेशनचे धान्य एका महिन्यासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ जिल्ह्यातील दोन लाख ३० हजार ७९ कुटुंबांना होणार आहे. दरम्यान, हा निर्णय होऊन १३ दिवसांचा कालावधी उलटला; मात्र मोफत धान्य मिळाले नसल्याने लाभार्र्थ्यांचे याकडे लक्ष लागून होते. आता मोफत धान्यवाटप १ मेपासून होणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले.
००००००
गहू व तांदूळ मिळणार
अंत्योदय, प्राधान्य गटातील लाभार्र्थ्यांना गतवर्षीप्रमाणेच यंदाही एका महिन्यासाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मिळणार आहेत.
०००००
एकूण रेशनकार्ड धारकांची संख्या २७८१५०
अंत्योदय ४८९७०
प्राधान्य कुटुंब १८११०९
केशरी १४७३९
००००
मोफत धान्य लवकर मिळावे
कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. या दरम्यान रोजगार मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी मोफत धान्याचा लाभ लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे.
- राजेंद्र वानखडे
......
लॉकडाऊनसारखी परिस्थिती असल्याने हातांना काम नाही. त्यामुळे घरची चूल कशी पेटवावी, असा प्रश्न पडला आहे. किमान दोन महिने पुरेल एवढे मोफत धान्य तातडीने देण्यात यावे.
- रामदास सावळे
......
मोफत धान्य मिळणार असल्याची घोषणा १३ दिवसांपूर्वी केली. अद्याप मोफत धान्य मिळाले नसल्याने ते कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष आहे. मोफत धान्याचा दर्जा हा उच्च प्रतीचा व खाण्यायोग्य असावा. किमान दोन महिन्यांचा धान्यसाठा द्यावा.
- शिवाजी पाईकराव
००००००
पात्र लाभार्थ्यांना एका महिन्यासाठी रेशनवरील धान्य १ मेपासून देण्यात येणार आहे. या संदर्भातील कार्यवाही सुरू आहे.
- सुनील विंचनकर
जिल्हा पुरवठा अधिकारी