सातबारा दाखवून घेता येणार ‘जीवनदायी’चा लाभ!
By admin | Published: May 28, 2017 04:03 AM2017-05-28T04:03:35+5:302017-05-28T04:03:35+5:30
डॉ. पाटील : मंगरूळपीरच्या शिवार संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : कुठल्याही अतिरिक्त कागदपत्रांचा जाच न ठेवता केवळ सात-बारा दाखवून शेतकर्यांना यापुढे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा वाशिमचे माजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवार, २७ मे ला दिली.
येथील वीरेंद्रसिंह ठाकूर यांच्या शेतात आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेश लुंगे, श्याम खोडे, सुनील मालपाणी, बंडू अव्हाळे, विष्णू चव्हाण, चंद्रमणी इंगोले, प्रा.घोडचर, डॉ.पिंपरकर, डॉ.दीपक ढोके, महेश अहिरकर, रवींद्र ठाकरे, नंदकिशोर चांभरे, गणेश लुंगे, अरुण फुके, गोपाल बाहेती, राजेंद्र राऊत, सचिन पवार, विशाल लवटे आदींची उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले की, सन २0१८ पर्यंंत २४ तास वीज पुरवठा देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून, येत्या दोन महिन्यात वंचित शेतकर्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचनाचा टक्का कमालीचा वाढला असून, त्याचा थेट फायदा बारमाही पिकांना मिळणार आहे. यासह इतरही विषयांसंबंधी डॉ.पाटील यांनी उपस्थित शेतकर्यांशी संवाद साधला.