सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:38+5:302021-09-19T04:41:38+5:30

वाशिम : आगामी काळात दसरा, दिवाळी यासह इतरही मोठे सण, उत्सव सुरू होणार आहेत. त्यायोगे विविध साहित्यांची विक्री करणाऱ्या ...

Beware, fraud can occur under the guise of festival offers | सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

googlenewsNext

वाशिम : आगामी काळात दसरा, दिवाळी यासह इतरही मोठे सण, उत्सव सुरू होणार आहेत. त्यायोगे विविध साहित्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ऑनलाईन फेस्टिव्हल ऑफर्स’ दिल्या जातील. याच काळात बनावट लिंकच्या वेबसाईटवर गेल्यास फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले.

फेस्टिव्हलच्या नावाखाली विविध वेबसाईटवर तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिराती सुरू झाल्या आहेत. लिंकद्वारे किंवा ॲपद्वारे अशा ऑफर नागरिकांच्या मोबाईलवर धडकू लागल्या आहेत; परंतु अनेक वेबसाईट, लिंक पैसा उकळण्याच्या उद्देशाने बनावट देखील असतात. त्यामुळे पैसे भरूनही वस्तू न येणे, मागविलेल्या वस्तूऐवजी दुसरीच येणे, खराब वस्तू पाठविणे असे प्रकार अलीकडच्या काळात घडले आहेत. त्यामुळे अनेकांची हजारो रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करताना सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे सायबर सेलचे म्हणणे आहे.

.............

अशी होऊ शकते फसवणूक

सध्या ‘सोशल मीडिया ट्रॅक’वर विविध माध्यमातून संसारोपयोगी वस्तूंसह घरात लागणाऱ्या इतर सर्वच साहित्य खरेदी करण्यासंदर्भातील जाहिराती येत आहेत. ‘ऑनलाईन’ पद्धतीने पैसे भरून वस्तू १० ते ४० टक्के सूट देऊन घरपोच पोहोचविण्याची ऑफर दिली जात आहे; मात्र ‘डिस्काऊंट’च्या आमिषाला बळी पडणे काहीवेळा महागात पडू शकते.

विविध नामांकित कंपन्यांचा लोगो वापरून, नाव वापरून वेबसाईटची लिंक तयार केली जाते. ती लिंक व्हॅाट्सॲप किंवा फेसबुकवर पाठविण्यात येऊन फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सूट असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र संबधित लिंक बनावट असते. भरलेले पैसे तर वाया जातातच, शिवाय वस्तूही मिळत नाही.

......................

ही घ्या काळजी

कंपनीच्या अधिकृत वेबसाईटद्वारेच वस्तूंची मागणी नोंदवायला हवी. ऑनलाईन पैसे अदा करताना सर्व बाबींची पडताळणी आवश्यक आहे. पसंतीला पडलेल्या महागड्या वस्तूऐवजी आधी अगदीच स्वस्त वस्तूची मागणी नोंदवा. खात्री पटली तरच पुढचा व्यवहार करा.

साहित्य निर्मितीमधील कुठलीही कंपनी २० ते २५ टक्केपेक्षा अधिकच्या सूटची ऑफर कधीच देत नाही. त्यामुळे ३० ते ५० टक्के फेस्टिव्हल ऑफरला बळी पडणे महाग पडू शकते. सहसा अशा कंपन्या बनावटच असतात.

....................

ऑनलाईन फसवणूक

जानेवारी - ०२

फेब्रुवारी - ००

मार्च - ०२

एप्रिल - ०१

मे - ००

जून - ०१

जुलै - ०१

ऑगस्ट - ०१

Web Title: Beware, fraud can occur under the guise of festival offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.