भर जहागिर जि. प. शाळेच्या दुरूस्तीसाठी आठ लाखांचा निधी मंजूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:39 AM2021-04-13T04:39:16+5:302021-04-13T04:39:16+5:30
भर जहागिर : भर जहागिर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, या संदर्भात ‘भर जहागिर येथील ...
भर जहागिर : भर जहागिर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, या संदर्भात ‘भर जहागिर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे !’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १६ डिसेंबर २०२० रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर शाळा समितीने संबंधित कामाच्या दुरूस्तीसाठी ठराव पारीत केला. मार्च महिन्यात वर्गखोलीच्या दुरूस्तीसाठी आठ लाखांचा निधी मंजूर झाला असून, कामाला प्रारंभही झाला आहे.
भर जहागिर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील शैक्षणिक उपक्रम मागील अनेक वर्षांपासून योग्य पध्दतीने राबविले जातात. परंतु, कोरोनामुळे शाळा भरविण्यावर बंदी आहे. शाळेची इमारत चारही बाजूने जीर्ण झाली आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. भर जहागिर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ३६७ विद्यार्थ्यांचा पट आहे. यामध्ये मुली १९९ तर मुले १६८ आहेत. सद्यस्थितीत १४ शिक्षक, शिक्षिकांच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे तर काही विद्यार्थ्यांना गृहपाठ डोअर टु डोअर दिला जात आहे. शाळेच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले होते. शौचालयाचीही दुरवस्था झाली होती, भिंतीला तडे गेले होते. या संदर्भात वृत्त प्रकाशित करताच, संबंधित यंत्रणेने याची दखल घेतली. सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ठराव घेतला. ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत जोडत केंद्रप्रमुख संतोष भिसडे यांच्यामार्फत कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केल्याने भर जहागिर जिल्हा परिषद शाळेच्या दुरूस्तीसाठी आठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शाळेच्या बांधकामाला सुरूवात झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.