शेतकऱ्यांसाठी ‘भूमिपुत्र’चे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:45+5:302021-09-16T04:51:45+5:30
वाशिम : जिल्ह्यात यावर्षी १९ व २० मार्च रोजी रब्बी हंगामात गारपिटीसह अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामेही ...
वाशिम : जिल्ह्यात यावर्षी १९ व २० मार्च रोजी रब्बी हंगामात गारपिटीसह अतिवृष्टी झाली. यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामेही करण्यात आले; मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. गेल्या खरीप हंगामात पीक विमा भरूनही शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला दिला गेला नाही. तो तत्काळ देण्यात यावा, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मार्च महिन्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात गारपीट व वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांची अतोनात हानी झाली. महसूल व कृषी विभागाने त्याचे पंचनामे केले. त्यानुसार ६९६५ खातेदार शेतकऱ्यांचे ४९९८.३२ हेक्टरवरील हरबरा, कांदा बियाणे, भाजीपाला, गहू, फळपिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले. असे असताना पात्र शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.
गेल्या वर्षांत खरीप हंगामात पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही अद्याप मोबदला मिळाला नाही. ऑनलाईन दावे दाखल केलेल्या काहीच शेतकऱ्यांना विमा कंपनीने मोबदला दिला, पंरतु बहुतांश शेतकऱ्यांना वर्ष उलटून गेले तरीही मदत मिळाली नाही. शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या मार्गदर्शनात धरणे अंदोलन करण्यात आले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, उत्तमराव आरू, संतोष सुर्वे, देव इंगोले, श्रीरंग नागरे, रामेश्वर बोरकर, भागवत गोटे, पवन खोंडकर, रजनीश खोंडकर, सचिन काकडे, शंकर हुंबाड, संतोष गव्हाणे, सीताराम लोखंडे, ग्यानदेव भुतेकर यांच्यासह ‘भूमिपुत्र’चे अन्य पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले.
............
फोटो - १.५३ चा मेल
ओळी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य.