- सुनील काकडेवाशिम: हजार लोकसंख्येच्या केकतउमरा या गावात पांडुरंगाचे वास्तव्य... घरी अठराविश्व दारिद्र्य; पण त्यांनी कधी नियतीपुढे हार पत्करली नाही... ईश्वरानेही त्यांच्या संयमाची परीक्षा घेत त्यांच्या पदरात नेत्रहीन मुलगा टाकला; मात्र तो वेगवेगळ्या प्रकारच्या कलेचा बादशहा ठरला. तोच पांडुरंगाचा छोटा चेतन आज स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासोबतच अन्य १३ नेत्रहीनांचा सारथी झाला आहे. विशेष म्हणजे, एकमेकांच्या साथीने ही १४ जणांची टीम आपले आयुष्य मोठ्या गुण्यागोविंदाने जगत आहे.चंद्र, सूर्य, तारे, मनमोहक झाडे, फळ, फूल आणि निसर्गातील सौंदर्याचे अनेकविध पैलू डोळ्यांनी पाहायला, अनुभवायला कुणाला आवडणार नाही? परंतु जे जन्मजात दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत, त्यांना निसर्गातील या घडामोडींची अनुभूती नाहीच येऊ शकत. असे असले तरी नेत्रहीनांना मायेचे दोन शब्द, सहानुभूती आणि आपले समजणाऱ्या माणसांचा सदोदित सहवास जगण्याचे बळ प्रदान करतो. आयुष्याच्या वेड्यावाकड्या वळणावर यशाची शिखरे पादाक्रांत करण्याची प्रेरणा देतो.पांडुरंग उचितकर, विलासराव कोल्हे यांच्यासारख्या साध्या माणसांनी अशाच चांगुलपणाचा प्रत्यय देत नेत्रहीनांच्या आयुष्यात उजेड पसरविण्यासाठी संपूर्ण जीवन वेचल्याने चेतन पांडुरंग उचितकर या नेत्रहीन चिमुकल्याच्या टीममधील प्रत्येकाने ‘चेतन सेवांकुर आॅर्केस्ट्रा’च्या माध्यमातून यशाच्या दिशेने आगेकूच केली आहे. चेतन उचितकर हा स्वत: अत्यंत उत्कृष्टरीत्या हार्मोनियम वाजवितो, गायन करतो, सामाजिक जनजागृतीपर विविध विषयांवर मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान देतो. यासह प्रवीण रामकृष्ण कठाळे, कैलास वसंतराव पानबुडे, संदीप केशव भगत, अमोल अर्जुना गोडघासे, दशरथ पुंजाजी जोगदंड, विजय राजाराम खडसे, भारत गोपाल खांडेकर, लक्ष्मी कैलास पानबुडे, कोमल भारत खांडेकर, अलका प्रवीण कठाळे, रूपाली फुलसावंगे, विकास गाडेकर, गजानन खडसे या उर्वरित नेत्रहीनांच्या अंगीही हार्मोनियम, तबला, बासरी, गायनाची अलौकिक कला दडलेली असून, ही नेत्रहीनांची टीम विविध ठिकाणचे कार्यक्रम गाजवत आहे. डोळसांनाही लाजवेल, अशी कामगिरी करून दाखवित आहेत. ‘चेतन सेवांकुर’च्या टीममधील प्रत्येकजण समाजातील इतरांसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून आपली छाप उमटवत आहेत.